कसोटी क्रिकेटमध्ये ५०० वा सामना खेळणाऱ्या भारतीय संघाच्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे. आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी शुक्रवारी जाहीर केली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत भारताची जागा आता न्यूझीलंडने घेतली आहे.  गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांपेक्षा कसोटी सामने अधिक खेळताना दिसला आहे. याचा परिणाम भारताच्या एकदिवसीय क्रमवारीवर झाल्याचे दिसते. आयसीसीने  जारी केलेल्या नव्या क्रमवारीत भारतीय संघ तिसऱ्या स्थानी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नव्या क्रमवारीत १२४ गुणांसह ऑस्ट्रेलियाने आपले अग्रस्थान कायम ठेवले असून  भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मजबूत स्थितीत असणाऱ्या न्यूझीलंडने ११३ गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे.

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने ८१३ गुणासह एकदिवसीय फलंदाजीच्या यादीत दुसरे स्थान पटकाविले आहे. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाला मागे टाकले.  दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज ए बी डेव्हिलिअर्स फलंदाजीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. कसोटी तसेच टी-२० क्रिकेट क्रमवारीमध्ये भारत दुसऱ्या स्थानी असून कसोटीमध्ये पाकिस्तान तर टी-२० क्रिकेट क्रमवारीमध्ये न्यूझीलंड अव्वल स्थानी आहे.

विराट कोहली व्यतिरिक्त भारतीय संघातील रोहीत शर्मा सातव्या आणि शिखर धवन आठव्या स्थानावर आहेत. मात्र गोलंदाजी आणि अष्टपैलूच्या यादीत पहिल्या दहामध्ये एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळविता आलेले नाही.