लंडन : क्रिकेटची पंढरी अशी ख्याती असलेल्या लॉर्ड्स मैदानावर भारतीय महिला संघाने शनिवारी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीला निर्भेळ यशाची भेट दिली. तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडला १६ धावांनी पराभूत केले. यासह भारताने मालिका ३-० अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघाचा डाव ४५.४ षटकांत १६९ धावांत आटोपला होता. स्मृती मानधना (५०), दिप्ती शर्मा (नाबाद ६८) व पूजा वस्त्राकार (२२) या तीन भारतीय फलंदाजांनाच दोन आकडी मजल मारता आली. 

आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची ७ बाद ६५ अशी स्थिती झाली होती. मात्र, चार्ली डिनने इंग्लंडच्या विजयासाठी प्रयत्न केले. पण, अखेरीस चार्लीच धावबाद झाली आणि इंग्लंडचा डाव १५३ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रेणुका सिंगने २९ धावांत ४ गडी तर, आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरचा सामना खेळणाऱ्या झुलनने दोन बळी मिळवले.

Story img Loader