पीटीआय, बर्मिगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील प्रलंबित पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार असून अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पाहुण्या संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला करोनाची बाधा झाल्यामुळे या सामन्याला मुकावे लागणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत बुमराला प्रथमच भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळेल. तो भारताचा ३६वा कसोटी कर्णधार ठरेल. बुमराची भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. गेल्या तीन-चार वर्षांपासून भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळताना त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र, आता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यामधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चार सामने गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळवण्यात आले होते. चार सामन्यांअंती भारताकडे २-१ अशी आघाडी होती. मात्र, मँचेस्टर येथील पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी भारताच्या काही साहाय्यक प्रशिक्षकांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे हा सामना स्थगित करणे भाग पडले होते. आता जवळपास नऊ महिन्यांनंतर हा कसोटी सामना बर्मिगहॅम येथील एजबॅस्टन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

दरम्यानच्या काळात दोन्ही संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षक बदलण्यात आले. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितकडे भारताच्या कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. मात्र, रोहित अजून करोनातून सावरलेला नसल्याने त्याला या कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. त्याचप्रमाणे केएल राहुलही दुखापतीमुळे या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याने बुमराकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तसेच गेल्या वर्षी चार सामने झाले, त्या वेळी रवी शास्त्री भारताचे प्रशिक्षक होते; परंतु त्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने राहुल द्रविडची प्रशिक्षकपदी निवड झाली.

दुसरीकडे, इंग्लंडचा संघ या कसोटी सामन्यात बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली आणि ब्रेंडन मॅककमलच्या मार्गदर्शनाखाली खेळेल. इंग्लंडने या दोघांच्या कार्यकाळाची दमदार सुरुवात केली. त्यांनी विश्वविजेत्या न्यूझीलंडला कसोटी मालिकेत ३-० अशी धूळ चारली.

त्यातच इंग्लंडचा संघ सकारात्मक मानसिकतेने आणि आक्रमक शैलीत खेळताना दिसला. त्यामुळे हा सामना जिंकत मालिका विजय साजरा करण्यासाठी भारताला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

कोहली, बुमरावर भिस्त

रोहित या कसोटी सामन्याला मुकणार असल्याने भारतापुढे सलामीचा पेच निर्माण झाला आहे. शुभमन गिलचे अंतिम ११ जणांतील स्थान पक्के असून दुसऱ्या सलामीवीरासाठी चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, केएस भरत आणि मयांक अगरवाल यांचा पर्याय भारताकडे उपलब्ध आहे. मात्र, रोहितच्या अनुपस्थितीत भारताच्या फलंदाजीची भिस्त कोहलीवर असणार आहे. कोहलीला गेल्या अडीच वर्षांहून अधिक काळ शतक करता आलेले नाही. मात्र, हा शतकाचा दुष्काळ तो या सामन्यात संपवेल अशी भारताला आशा आहे. मधल्या फळीत त्याला श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतची साथ लाभेल. तसेच रवींद्र जडेजा अष्टपैलूची भूमिका बजावणे अपेक्षित असून आठव्या क्रमांकासाठी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर यांच्यात स्पर्धा आहे. वेगवान गोलंदाजीची मदार कर्णधार बुमरासह मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजवर असेल.

रूट, बेअरस्टोला रोखण्याचे आव्हान

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडचा संघ आक्रमक शैलीत खेळताना दिसला. स्टोक्स-मॅककलम जोडीने खेळाडूंना मोकळीक दिली आणि याचा सर्वाधिक फायदा जॉनी बेअरस्टोला झाला आहे. त्याने या मालिकेत १२० हून अधिकच्या धावगतीने दोन शतकांसह जवळपास ४०० धावा केल्या. तसेच माजी कर्णधार जो रूटही सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्यामुळे त्यांना रोखण्याचे भारतीय गोलंदाजांपुढे आव्हान असेल. तसेच कर्णधार स्टोक्सचा अष्टपैलू योगदानाचा प्रयत्न असेल. इंग्लंडला सलामीच्या जोडीची चिंता आहे. बेन फोक्स करोनातून सावरलेला नसून या सामन्यात सॅम बिलिंग्ज यष्टीरक्षणाची धुरा सांभाळेल. गोलंदाजीत जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड पुन्हा महत्त्वाची भूमिका बजावतील.

संघ

  • भारत : जसप्रीत बुमरा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मयांक अगरवाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिध कृष्णा.
  • इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), झ्ॉक क्रॉली, अ‍ॅलेक्स लीस, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), मॅटी पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, जॅक लिच.
  • वेळ : दुपारी ३ वा.
  • थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३ (संबंधित एचडी वाहिन्या)

Story img Loader