IND vs BAN Team India lost the toss 11 times in ODI : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये, भारतीय संघ दुबईच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या ग्रुप अ मधील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. या सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावताच, भारतीय संघाने एका खास यादीत नेदरलँड्सच्या विक्रमाची बरोबरी केली.
वनडे सलग नाणेफेक गमावण्याच्या बाबतीत भारताने नेदरलँड्सची केली बरोबरी –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, कोणत्याही संघाने सलग सामन्यांमध्ये नाणेफेक गमावणे हे फारच दुर्मिळ आहे. एकदिवसीय सामन्यांमधील हा विक्रम सध्या नेदरलँड्स संघाच्या नावावर आहे, ज्याची बरोबरी आता भारतीय संघाने केली आहे. कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध नाणेफेक गमावताच, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर हा सलग ११ वा एकदिवसीय सामना होता. ज्यामध्ये भारतीय संघ नाणेफेक जिंकू शकला नाही. याआधी, नेदरलँड्स संघाने मार्च २०११ ते ऑगस्ट २०१३ पर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग ११ नाणेफेक गमावली होती.
भारताच्या प्लेइंग इलेव्हलमध्ये तीन फिरकीपटूंना स्थान –
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यातील भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन फिरकी गोलंदाजांना स्थान मिळाले आहे, ज्यामध्ये अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांच्याव्यतिरिक्त कुलदीप यादवचा समावेश आहे. याशिवाय, वेगवान गोलंदाजीत, हर्षित राणा त्याच्या कारकिर्दीतील पहिला आयसीसी टूर्नामेंट सामना खेळत आहे. नाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, तो प्रथम क्षेत्ररक्षणच करू इच्छित होता. कारण दुसऱ्या डावात चेंडू बॅटवर चांगला येतो.
सामन्याबद्दल बोलायचे तर वृत्त लिहिपर्यंत बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना १४ षटकानंतर ५ बाद ५४ धावा केल्या आहेत. तौहिद हृदयॉय ११ आणि जेकर अली १० धावांवर खेळत आहेत. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने २ आणि अक्षर पटेलने २ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर हर्षित राणाने एक विकेट घेतली आहे.
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन :
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी