खेळाडूंना संघातील स्थानाविषयी स्पष्टता देणे गरजेचे; साहाच्या आरोपावर प्रशिक्षकाचे मत

भारताचा अनुभवी यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने केलेल्या आरोपावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सोमवारी स्पष्टपणे मत मांडले. साहाच्या आरोपामुळे आपल्याला मुळीच दु:ख झालेले नसून त्याच्यासह प्रत्येक खेळाडूला संघातील त्याचे स्थान आणि भूमिकेबाबत प्रामाणिकपणे सांगणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया द्रविडने व्यक्त केली.

बंगालच्या ३७ वर्षीय साहाने रविवारी खळबळजनक खुलासा केला. प्रशिक्षक द्रविड आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आपल्याला अप्रत्यक्षपणे निवृत्ती पत्करण्याचे सुचवल्याचे साहाने सांगितले. त्याशिवाय त्याने ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीने दिलेल्या आश्वासनानंतरही संघातून वगळल्यामुळे धक्का बसल्याचे नमूद केले. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातील विजयासह मालिकेत निर्भेळ यश संपादन केल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत साहाच्या विधानांवर द्रविडने भाष्य केले.

‘‘खरे सांगायचे तर, साहाच्या आरोपामुळे मला अजिबात वाइट वाटलेले नाही. साहाने भारतासाठी दिलेल्या योगदानाचा मला प्रचंड आदर आहे. मात्र प्रशिक्षक म्हणून संघ व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय साहाला विश्वासात घेऊन सांगणे गरजेचे होते. साहाच्या संघातील भूमिकेबाबत पारदर्शकता राखणे अनिवार्य होते,’’ असे ४९ वर्षीय द्रविड म्हणाला.

‘‘साहाच्या जागी अन्य कोणता खेळाडू असता तरीसुद्धा प्रशिक्षक या नात्याने मी हेच केले असते. कोणत्याही खेळाडूला त्याचे संघातील स्थान आणि भविष्यातील आव्हानांचा विचार करता त्याच्या भूमिकेबाबत कल्पना देणे महत्त्वाचे आहे. तसेच एखाद्या लढतीसाठी ११ खेळाडूंचा संघ निवडल्यावर वगळण्यात आलेल्या खेळाडूंशीही मी संवाद साधून त्यांना स्थान न देण्यामागचे कारण स्पष्ट करतो,’’ असेही द्रविडने सांगितले.

खेळाडूने प्रत्येक वेळी माझ्या मताचा आदर करणे गरजेचे नाही. मात्र यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये संवाद सुरू राहतो. त्यामुळे संघात पारदर्शकता टिकून राहते, असेही द्रविडने नमूद केले. याव्यतिरिक्त, ऋषभ पंत हा पुढील किमान १० वर्षे तिन्ही प्रकारांत भारताच्या यष्टिरक्षकाची भूमिका बजावू शकतो. के. भरत, इशान किशन यांसारखे पर्याय तयार करण्याचा आमचा मानस आहे, याकडेही द्रविडने लक्ष वेधले. सदर प्रकरणाबाबत गांगुलीने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

विश्वचषकाच्या संघरचनेचा गुंता सुटला -द्रविड

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताची संघरचना कशी असावी, याचे उत्तर आम्हाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेद्वारे मिळाल्याचे प्रशिक्षक द्रविडने सांगितले. ‘‘माझ्यासह रोहित आणि निवड समितीचे सदस्य या मालिकेतील खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून होते. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी कोणता खेळाडू कोणत्या स्थानावर खेळेल, हे ठामपणे सांगू शकत नाही. मात्र संघाची रचना कशी असावी, हे मला समजलेले आहे. आता त्यानुसार श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत प्रत्येक स्थानासाठी अधिकाधिक पर्याय शोधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’’ असे द्रविड म्हणाला.

साहाच्या ‘ट्वीट’ची ‘बीसीसीआय’कडून चौकशी

एकूण ४० कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साहाने रविवारी एका पत्रकाराविषयी केलेल्या ‘ट्वीट’मुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यामध्ये मुलाखतीसाठी प्रतिसाद न दर्शवणाऱ्या साहाला त्या पत्रकाराने सुनावले आहे. तसेच त्याने अशी चूक केल्यामुळे परिणाम भोगावे लागू शकतात, असाही संदेश साहाच्या ‘ट्वीट’मध्ये दिसून येतो. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी याविषयी मत व्यक्त केल्यानंतर ‘बीसीसीआय’ने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी साहाला पत्रकाराचे नाव विचारले असून त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.