आत्मविश्वासाच्या जोरावर खेळणाऱ्या भारतास आशियाई फुटबॉल फेडरेशन चषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत उद्या चीन तैपेई संघाशी खेळावे लागणार आहे.
भारतास नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीय लढतीत पॅलेस्टाईनविरुद्ध २-४ असा पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात भारताकडून गोल करणारे सईद रहीम नबी व क्लिफोर्ड मिरांडा यांच्यावर उद्याही भारताची भिस्त आहे. भारताचा कर्णधार सुनील छेत्री याच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्याच्याबरोबरच अल्विन जॉर्ज, जेजे लाल्पेखुलवा व रॉबिनसिंग यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. बचाव फळीत डेन्झिल फ्रँको, गौरामणीसिंग, शौविक घोष, गुरजिंदरसिंग हे प्रतिस्पर्धी संघाच्या चाली रोखण्याची कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. मधल्या फळीत सईद नबी याच्याबरोबरच मेहताब हुसेन, लेनी रॉड्रिग्ज यांच्यावर संघाची भिस्त आहे. नेदरलँड्सचे ज्येष्ठ प्रशिक्षक विम कोव्हरमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ उतरणार आहे. गतवर्षी भारताने पात्रता फेरीत तैपेईला ३-० अशी धूळ चारली होती. भारतास जागतिक स्तरावर १६७ वे मानांकन असून तैपेई संघ १७१ व्या क्रमांकावर आहे.
प्रत्येक सामना गांभीर्यानेच घेणार : छेत्री
या स्पर्धेत यापूर्वी आम्ही विजेतेपद मिळविले असले तरी प्रत्येक सामना आम्ही गांभीर्यानेच घेणार आहोत. देशास सर्वोत्तम यश मिळवून देण्यासाठीच मी खेळत असतो. ही स्पर्धा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. संघातील प्रत्येक खेळाडू क्षमतेइतकी सर्वोत्तम कामगिरी करील असा आत्मविश्वास छेत्री याने व्यक्त केला. भारतास चार मार्च रोजी गुआम संघाशी खेळावे लागणार आहे तर म्यानमार संघाबरोबर सहा मार्च रोजी त्यांचा सामना होईल.

Story img Loader