पदकाच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी विजय महत्त्वाचा
युवा आणि अनुभवी खेळाडूंची सांगड घालून सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पध्रेत उतरलेल्या भारतीय संघाला मंगळवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या भारताला पदकाच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा अधिक चुरस या लढतीत पाहायला मिळवण्याची शक्यता हॉकीप्रेमींना आहे.
पाच वेळा अझलन शाह चषक उंचावणाऱ्या भारतीय संघाला गतवर्षी कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदा त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी संघ उत्सुक आहे, परंतु युवा खेळाडूंसह मैदानात उतरलेला भारत अनेक आघाडींवर कमकुवत वाटत आहे. रविवारी कॅनडावरील विजयाने भारताचे मनोबल उंचावले असले तरी पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी त्यांना संपूर्ण ताकदीने खेळ करावा लागणार आहे.
भारताने साखळी सामन्यांत तीनपैकी दोन विजय मिळवून सहा गुणांची कमाई केली आहे, तर पाकिस्तानच्या खात्यात केवळ तीन गुण आहेत. त्यांनी एकमेव विजय कॅनडावर मिळवला होता, तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. गुणतालिकेत नऊ गुणांसह विश्वविजेता ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे, तर गतविजेता न्यूझीलंड चार सामन्यांनंतर आठ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे भारताला गुणतालिकेत आगेकूच करण्याची संधी आहे.
‘भारतीय संघ या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे, परंतु इतर सामन्यांप्रमाणेच हा सामना आहे, हे मी खेळाडूंना वारंवार सांगत आहे,’ असे भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक रोअलंट ओल्टमन्स यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘ पाकिस्तानविरुद्धची ही लढत असली तरी त्याचे अतिरीक्त दडपण आमच्यावर नाही. हा आमच्यासाठी एक सामना आहे आणि त्यासाठीचे लक्ष्य आम्ही निश्चित केले आहे. ’
पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारताविरुद्ध संपूर्ण कौशल्य पणाला लावून आणि भावनांवर संयम राखून खेळ करावा, अशी अपेक्षा पाकिस्तान हॉकी संघाचे प्रशिक्षक ख्वाजा जुनैद यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले,‘भारताविरुद्धचा सामना स्पध्रेला कलाटणी देणारा आहे. संपूर्ण संघाची पुनर्बाधणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सामन्याची रणनीती अवलंबविणे, ही महत्त्वाची बाब आणि ऐक्य दाखवण्याची गरज आहे.’

सामन्याची वेळ : दुपारी ३.३५ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ व १ एचडी आणि स्टार स्पोर्ट्स ३ व ३ एचडी

 

Story img Loader