ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकात कोण जिंकणार, हे सांगणे अतिशय अवघड आहे. भारत जिंकणार, असे भावनिकपणे म्हणणे योग्य ठरणार नाही. मागच्या विश्वचषकाच्या वेळी भारतीय संघातील सर्व खेळाडू अनुभवी होते. या वेळच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे हा संघ समतोल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आपण २०११मध्ये विश्वविजेतेपद जिंकले आहे. जगज्जेतेपदाचा हा अनुभव अतिशय उपयुक्त ठरेल. जरी कसोटी क्रिकेटमध्ये भारताला अपयश पदरी पडले असले तरी धोनीचे एकदिवसीय क्रिकेटमधील मार्गदर्शन संघाला फायद्याचे ठरेल.
यजमान संघांना वातावरण, खेळपट्टय़ा आणि प्रेक्षकवर्ग यांच्या अनुकूलतेचा नेहमी फायदा होतो. परंतु भारतीय संघ गेले दोन महिने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका आणि तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा खेळत असल्यामुळे त्यांना याचा चांगला फायदा होऊ शकेल. कसोटी मालिकेत आपण ऑस्ट्रेलियातील वेगवान आणि फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टय़ांची अनुभूती घेतली. त्यामुळे चेंडू वळणाऱ्या खेळपट्टय़ा उपलब्ध झाल्यास भारतीय संघ त्याचा चांगला फायदा घेऊ शकतो. परंतु अननुभवी वेगवान माऱ्याची समस्या प्रकर्षांने जाणवत आहे. पण तरीही भारताला विजेतेपदाची संधी आहे, असे मला वाटते. मागच्या विश्वचषकाच्या वेळी आपले क्षेत्ररक्षण कमकुवत होते. परंतु गेल्या काही वर्षांत भारताच्या क्षेत्ररक्षणात कमालीची सुधारणा पाहायला मिळत आहे. याचप्रमाणे भारतीय संघाचा सकारात्मक दृष्टिकोन मला महत्त्वाचा वाटतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी चांगल्या धावा केल्या. विराट कोहली फॉर्मात आहे. एकदिवसीय क्रिकेट जरी वेगळे असले तरी भारतीय संघ त्यात निपुण आहे.
दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारताकडून चांगले क्रिकेट पाहायला मिळेल, अशी माझी अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांत ट्वेन्टी-२० क्रिकेटचा कमालीचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे चांगले एकदिवसीय सामने पाहायला मिळतील.
(शब्दांकन : प्रशांत केणी)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा