टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा कडू आठवणींचा ठरला. यजमान दक्षिण आफ्रिकेने केपटाऊनमधील तिसरी वनडेही जिंकली. यासह त्यांनी ही मालिका ३-० ने खिशात टाकली. या पराभवाच्या वेदनेनंतर भारतीय संघाला आयसीसीने अजून एक धक्का दिला आहे. तिसऱ्या वनडेमध्ये षटकांची गती निर्धारित वेळेपेक्षा कमी ठेवल्याबद्दल टीम इंडियाला मॅच फीच्या ४० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. निर्धारित वेळेत २ षटके कमी टाकल्याबद्दल भारतीय संघावर हा दंड ठोठावण्यात आला आहे.
आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२२नुसार, जर संघाने निर्धारित वेळेत षटकांचा कोटा पूर्ण केला नाही, तर प्रत्येक षटकासाठी खेळाडूंना मॅच फीच्या २० टक्के दंड आकारला जातो. केएल राहुलने आपली चूक मान्य करत आयसीसीच्या दंडाची शिक्षा स्वीकारली आहे. त्यामुळे यावर वेगळी अधिकृत सुनावणी होणार नाही.
हेही वाचा – “भारतीय व्यावसायिकानं मला कोकेन दिली आणि…”, दिग्गज क्रिकेटपटूनं केला खुलासा अन् उडाली खळबळ!
केपटाऊन येथील तिसऱ्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ४९.५ षटकांत २८७ धावा केल्या. फॉर्मात असलेल्या क्विंटन डी कॉकने शानदार १२४ धावा केल्या तर रूसी व्हॅन डर डुसेनने ५२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडिया ४९.२ षटकांत २८३ धावांत ऑलआऊट झाली. भारताकडून विराट कोहलीने ६५ धावा केल्या. त्याच्याशिवाय शिखर धवननेही अर्धशतक झळकावले.