भारतीय बॉक्िंसगपटूंनी सातही सुवर्णपदके नावावर करून सोमवारचा दिवस गाजवला, तर नेमबाजांनी २५ सुवर्णपदकांसह दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेचा निरोप घेतला. बॉक्सिंगपटू आणि नेमबाजांच्या सुवर्ण कामगिरीच्या जोरावर भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेतील अव्वल स्थान कामय राखले आहे. भारताच्या खात्यात १८३ सुवर्ण, ८८ रौप्य आणि ३० कांस्य अशी एकूण ३०१ पदके जमा आहेत. श्रीलंका १८१ (२५ सुवर्ण, ६० रौप्य आणि ९६ कांस्य) पदकांसह दुसऱ्या, तर पाकिस्तान १०० (१० सुवर्ण, ३५ रौप्य आणि ५५ कांस्य) पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय महिला फुटबॉल संघानेही नेपाळवर
४-० असा विजय मिळवून सुवर्णपदक पटकावले. पुरुषांना मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
राष्ट्रकुल स्पध्रेतील रौप्यपदक विजेत्या बॉक्सिंगपटू एल. देवेंद्रो सिंगने पुरुषांच्या ४९ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मोहिब उल्लाचा २-१ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. ३५ वर्षीय माजी राष्ट्रीय विजेत्या मदन लालने (५२ किलो) पाकिस्तानच्या मोहम्मद सय्यद आसीफचा ३-० असा सहज पराभव केला. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या आणि विश्व अजिंक्यपदक स्पध्रेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या शिवा थापाने (५६ किलो) सुवर्णपदक जिंकले. अंतिम लढतीत त्याने श्रीलंकेच्या डब्लू. रुवान थिलीनाचा सहज पराभव केला. विकास क्रिष्णनने (७५ किलो) पाकिस्तानच्या तन्वीर अहमदचा ३-० असा पराभव केला. २० वर्षीय धीरज रांगीने ६० किलो वजनी गटात पाकिस्तानच्या अहमद अलीचा पराभव केला. अनुभवी मनोज कुमारने ३-० अशा फरकाने श्रीलंकेच्या दिनीदू सपरामदूचा ६४ किलो वजनी गटात पराभव करून सुवर्णपदक जिंकले. ६९ किलो वजनी गटात मनदीप जांगराने अफगाणिस्तानच्या राहेमी अल्ला दाडचा ३-० पराभव केला.
नेमबाजीत २५ सुवर्णपदक
भारतीय नेमबाजांनी अविश्वसनीय कामगिरी करताना २६ पैकी २५ गटांत बाजी मारून दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा गाजवली. नेमबाज प्रकारातील अखेरच्या दिवशी रिओ ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवणाऱ्या गुरप्रीत सिंग आणि श्वेता सिंग यांनी सुवर्णपदक पटकावले. गुरप्रीतने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात २८ गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर श्वेताने १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक महिला प्रकारात १९४.४ गुणांसह बाजी मारली. याच गटात हीना सिधूने रौप्यपदक, तर १८ वर्षीय यशस्विनी सिंग देस्वालने कांस्यपदक जिंकले. सांघिक प्रकारातही भारताने सुवर्णपदकाची कमाई केली.
नेमाबजीत भारताच्या खात्यात एकूण २५ सुवर्ण, १० रौप्य आणि १० कांस्यपदके जमा आहेत. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अपयशी ठरलेल्या गुरप्रीतने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात बाजी मारली. पाकिस्तानच्या बशीर गुलाम मुस्तफाने रौप्य, तर भारताच्या विजय कुमारने कांस्यपदक जिंकले. ‘‘सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद आहे. अंतिम सामन्यापूर्वी प्रशिक्षकांनी मला शांतपणे खेळ करण्याचा सल्ला दिला होता. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे आणि अशा स्पर्धात्मक वातावरणात सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात यश आले, याचा आनंद आहे. आगामी विश्वचषक लीग स्पर्धा आव्हानात्मक असेल आणि त्यात चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न आहे,’’ असे गुरप्रीतने सांगितले.
महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतीय नेमबाजांमध्येच चुरस रंगली. मात्र, त्यात श्वेताने बाजी मारली. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या सिधूला मात्र समाधानकारक खेळ करता आला नाही. ती म्हणाली, ‘‘पात्रता फेरीत मी चांगली कामगिरी केली, परंतु अंतिम फेरीसाठी अधिक तयारीची आवश्यकता आहे. रिओ ऑलिम्पिकपूर्वी त्यावर काम करणार आहे. विश्वचषक स्पध्रेच्या बँकॉक लीगमध्ये सहभाग घेणार नाही, परंतु पुढील तीन लीगमध्ये खेळेन.’’
पुरुष व महिला कबड्डी संघांना जेतेपद
भारतीय पुरुष व महिला कबड्डी संघाने अपेक्षित कामगिरी करताना दुहेरी जेतेपद पटकावले. महिलांच्या अंतिम सामन्यात तेजस्विनी बाय, अभिलाषा म्हात्रे व प्रियंका यांच्या धारदार आक्रमणाच्या जोरावर भारताने ३६-१२ अशा फरकाने बांगलादेशचा पराभव केला. पुरुषांच्या अंतिम फेरीत भारताला शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ९-७ असा विजय मिळवत सुवर्णपदकावर कब्जा केला. मध्यंतराला ५-५ अशा बरोबरीत असलेल्या सामन्यात रोहित कुमारने चढाईत एक गुण टिपून भारताला एका गुणाची आघाडी मिळवून दिली. शेवटच्या काही मिनिटात पाकिस्तानच्या अखेरच्या दोन गडय़ांनी रोहितची पकड करून सुपर कॅचचे दोन गुण पटकावले. त्यामुळे भारताच्या चमूत तणावाचे वातावरण होते, परंतु कर्णधार अनुप कुमारने अनुभव पणाला लावून संघाला सुवर्णपदक पटकावून दिले. रोहित व अनुपला राहुल चौधरीची चांगली साथ मिळाली.

संघटनेतील वादामुळे बॉक्सिंगपटूंचे खच्चीकरण – मेरी कोम
भारतात बॉक्सिंग संघटनेतील वादावर चिंता व्यक्त करताना ऑलिम्पक कांस्यपदक विजेती बॉक्सिंगपटू एम. सी. मेरी कोमने खेळाडूंचे भविष्य अंधारात असून वादामुळे त्यांचे खच्चीकरण होत असल्याचा दावा केला आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने गेल्यावर्षी राष्ट्रीय संघटना बरखास्त केली होती. त्यानंतर भारतातील बॉक्सिंगचा कारभार सुकाणू समिती चालवीत आहे.
रिओ ऑलिम्पिकपूर्वी हा वाद संपुष्टात आणायला हवा, असा आशावाद पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या कोमने व्यक्त केला आहे. ती म्हणाली, ‘‘बॉक्सिंगपटूंचे खच्चीकरण झाले आहे. कोणतीच स्पर्धा होत नसल्यामुळे ते निराश झाले आहेत. त्यांच्या मेहनतीला काहीच अर्थ उरला नाही. त्यांनी बराच संयम बाळगला आहे, परंतु स्पर्धाच न झाल्यास त्यांचे भविष्य अंधारमय होईल. वरिष्ठ खेळाडूंसाठी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा आणि इतर पात्रता स्पर्धा आहेत.’’
सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक
भारतीय खेळाडूंनी तायक्वांदोत सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक नोंदवली. लतिका भंडारी (५३ किलो) आणि मार्गेरिटा रेगी (६२ किलो) यांनी महिला गटात, तर नवजीत मन याने (८० किलोखालील) पुरुष गटात सुवर्णपदक पटकावले.
ओइनमला विजयी निरोप
भारतीय महिला फुटबॉल संघाने ४-० अशा फरकाने नेपाळचा पराभव करून अव्वल खेळाडू ओइनम बेम्बेम देवीला सुवर्ण निरोप दिला. कमला देवीने (३२ मि. व ५६ मि.) दोन गोल केले, तर बाला देवी (७१ मि.) आणि आशालता देवी (८० मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
सुवर्णपदकाची हुलकावणी
१९९५च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदक पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय पुरुष फुटबॉल संघाला यंदाही हुलकावणी मिळाली. भारताकडे पहिल्या सत्रात १-० अशी आघाडी होती. मात्र नेपाळने मुसंडी मारत अंतिम लढतीत २-१ अशी बाजी मारली. नेपाळकडून प्रकाश थापा (६६ मि.) आणि नवयुग श्रेष्ठ
(७२ मि.) यांच्या प्रत्येकी एक गोल केला. भारताकडून होलिचरण नाझरीने (३१ मि.) गोल केला.
दमदार सुरुवात
भारताच्या ज्युदोपटूंनी सात सुवर्ण आणि एक रौप्यपदकाने आपले खाते उघडले. भूपिंदर सिंग (६० किलो), जसलीन सिंग सैनी (६६ किलो), मनजीत नाडल (७३ किलो) आणि करणजीत सिंग मान (८१ किलो) यांनी पुरुष गटात, तर सुशीला देवी लिकमबाम (४८ किलो), कल्पना देवी थौडम (५२ किलो) आणि अनिता चानू अ‍ॅन्गोम (५७ किलो) यांनी महिला गटात सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या ६३ किलो वजनी गटात सुनीबाला देवी हुईद्रोमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Story img Loader