सहा वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या बलाढय़ ऑस्ट्रेलियाचा पाडाव करण्यासाठी भारताने युवा हॉकी संघ निवडला खरा. पण दुय्यम खेळाडूंचा समावेश असलेल्या भारताला अझलन शाह हॉकी स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ३-४ असे पराभूत व्हावे लागले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच दोन मिनिटांत भारताला ऑस्ट्रेलियाकडून दोन गोल पत्करावे लागले. हाच सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला. ऑस्ट्रेलियाकडून मॅट गोहड्स याने (२४व्या आणि ३९व्या मिनिटाला) दोन गोल केले. ग्लेन सिम्पसन (३९व्या मिनिटाला) आणि ट्रेन्ट मिल्टन (५३व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल करत कांगारूंच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ऑस्ट्रेलियाने मध्यंतराला १-० अशी आघाडी घेतली होती.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या १० मिनिटांच्या खेळावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले होते. ऑस्ट्रेलियाच्या टिम बेट्सचे हल्ले परतवून लावत भारताचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याने सुरेख कामगिरी केली. अखेर भारताचे क्षेत्ररक्षण भेदत ऑस्ट्रेलियाने २४व्या मिनिटाला पहिला पेनल्टीकॉर्नर मिळवला. श्रीजेशने सुरेख कामगिरी करत हा फटका अडवला, पण परतीच्या फटक्यावर गोहड्सने गोल करत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्राची सुरुवात ऑस्ट्रेलियाने शानदार केली. सिम्पसनने पेनल्टीकॉर्नरवर दुसरा तर गोहड्सने तिसरा गोल करत ऑस्ट्रेलियाची आघाडी ३-०वर नेली. पण ४१व्या मिनिटाला रुपिंदरपाल सिंगने पेनल्टीकॉर्नरवर गोल करून भारताचे खाते खोलले. मनदीप सिंग आणि चिंगेलसाना यांच्या सुरेख पासवर मलक सिंगने भारतासाठी दुसरा गोल केला. ५३व्या मिनिटाला रुपिंदरपालने आणखी एक गोल करत भारताच्या बरोबरी साधण्याच्या आशा पल्लवित केल्या. पण त्यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाचा बचाव भेदता आला नाही. अन्य सामन्यांत, पाकिस्तानने न्यूझीलंडवर ४-३ अशी मात केली.