२-१ अशा गोल फरकाने विजय
भारताने अपेक्षा उंचावणारी कामगिरी करीत येथे मंगळवारी आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेतील पुरुष गटात अंतिम फेरी गाठली. त्यांनी उपांत्य फेरीतील उत्कंठापूर्ण लढतीत पाकिस्तानवर २-१ असा सनसनाटी विजय नोंदविला.
या स्पर्धेतील साखळी गटात भारताने सलग चौथा विजय मिळविला. त्यांनी याआधी चीन (४-०), जपान (३-१) व ओमान (११-०) यांच्याविरुद्धचे सामने जिंकले होते.  पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत भारताच्या रुपींदरपालसिंग व चिंगलेनसाना यांनी अनुक्रमे ३६ व्या व ५१ व्या मिनिटाला गोल केले. पाकिस्तानच्या महंमद वकास याने ५७ व्या मिनिटाला गोल करीत सामन्यात चुरस निर्माण केली, मात्र त्यानंतर त्यांना एकही गोल करता आला नाही. शेवटच्या साखळी गटात भारताची मलेशियाबरोबर गाठ पडणार आहे. भारताने १२ गुणांसह साखळी गटात आघाडी स्थान घेतले आहे. मलेशिया व पाकिस्तान यांचे प्रत्येकी सात गुण झाले असून ते संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
पाकिस्तानने नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स स्पर्धेत भारतावर मात करीत कांस्यपदक मिळविले होते. या पराभवाची परतफेड भारताने येथे केली. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. पूर्वार्धात दोन्ही संघांनी जोरदार चाली केल्या मात्र गोल करण्यात दोन्ही संघांना अपयश आले. उत्तरार्धात सुरुवातीपासूनच भारताने जोरदार आक्रमण केले. दानिश मुस्तफा या भारताच्या युवा खेळाडूने पाकिस्तानच्या बचावरक्षकांना चकवित थेट गोलापर्यंत मुसंडी मारली. पाकिस्तानच्या खेळाडूंनी त्याला धक्का दिल्यामुळे मलेशियन पंच लिंगम कारुप्पुसाकी यांनी भारतास पेनल्टी स्ट्रोक बहाल केला. त्याचा पुरेपूर फायदा घेत रुपींदरने गोल केला व भारताचे खाते उघडले. या गोलमुळे भारतीय खेळाडूंच्या आक्रमणास धार आली. ५१ व्या मिनिटाला भारतीय खेळाडूंनी पुन्हा जोरदार मुसंडी मारली.
गुरविंदर चंडी याने दिलेल्या पासवर चिंगलेनसाना याने कोणतीही चूक न करता भारताचा दुसरा गोल केला. भारताचा २-० या आघाडीचा आनंद अल्पकाळ ठरला. त्यानंतर सहाच मिनिटांनी पाकिस्तानला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत महंमद वकास याने संघाचे खाते उघडले. या गोलबाबत भारतीय खेळाडूंनी आक्षेप घेतला, मात्र पंचांनी हा गोल पाकिस्तानला बहाल केला. त्यानंतर भारताचा उपकर्णधार रघुनाथ याला पिवळे कार्ड दाखविण्यात आले.
सामन्यात बरोबरी करण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंनी वेगवान चाली केल्या मात्र भारताच्या खेळाडूंनी भक्कम बचाव करीत त्यांच्या चाली असफल ठरविल्या.     

Story img Loader