भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन वनडे मालिकेतील दुसरा सामना आज (बुधवार ७ डिसेंबर) होणार आहे. ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवरही हा सामना होणार आहे. या मैदानावरील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा एका विकेटने पराभव झाला होता. दुसरा वनडे जिंकून भारत मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. बांगलादेशातील सलग दुसरी द्विपक्षीय वनडे मालिका गमावणे भारतीय संघाला परवडणार नाही. त्याचबरोबर बांगलादेश संघ आजचा सामना मालिकेवर आपले नाव करण्यासाठी सज्ज असणार आहे.

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने जिंकला आहे. त्यामुळे तो संघ मालिकेतील १-० ने आघाडीवर आहे. भारत आणि बांगलादेश संघातील दुसऱ्या वनडे सामन्याला सकाळी ११:३० वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. शार्दुल ठाकूर जखमी झाल्याचे वृत्त आहे. या सामन्यात शार्दुल खेळला नाही, तर उमरान मलिकला संधी दिली जाऊ शकते. तो नेटवर बराच वेळ सराव करतानाही दिसला होता. त्याचवेळी शाहबाद अहमदच्या जागी अक्षर पटेलचाही या सामन्यात समावेश केला जाऊ शकतो.

टीम इंडियाला २०१५ मध्ये तीन सामन्यांच्या मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार होता. यावेळी रोहित शर्माला कोणत्याही परिस्थितीत मालिका गमवून चालणार नाही. भारताने बांगलादेशविरुद्ध ३७ पैकी ३० सामने जिंकले आहेत. बांगलादेशने आपल्या मायदेशात ऑक्टोबर २०१६ पासून एकही मालिका गमावलेली नाही. यादरम्यान त्यांनी झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा पराभव केला आहे.

हेही वाचा – महिला संघाचा प्रशिक्षक रमेश पोवारची ‘एनसीए’मध्ये बदली!; ऋषिकेश कानिटकर फलंदाजी प्रशिक्षकपदी

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद/अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर/उमरान मलिक, दीपक चहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन.

बांगलादेश: लिटन दास (कर्णधार), अनामुल हक, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, अफिफ हुसैन, मेहिदी हसन मिराज, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, इबादत हुसेन.

Story img Loader