एएफसी चॅलेंज चषक पात्रता फेरी
पुढील वर्षी होणाऱ्या एएफसी चॅलेंज चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र होण्याकरिता फॉर्मात असलेल्या भारतीय संघाने पात्रता फेरीतील अखेरच्या सामन्यात म्यानमारविरुद्ध पूर्ण गुण वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारत आणि म्यानमार यांच्यातील ही लढत बुधवारी होणार आहे.
या स्पर्धेतील दोन विजयांसह भारताने म्यानमारविरुद्धचा सामना बरोबरीत राखला तरी २०१४मध्ये होणाऱ्या एएफसी चॅलेंज चषक स्पर्धेतील भारताचा सहभाग निश्चित होऊ शकतो. भारताने पात्रता फेरीत तैवानवर २-१ असा तर गुआमवर ४-०ने विजय मिळवत शानदार सुरुवात केली आहे. मात्र म्यानमारने विजय मिळवल्यास, ते भारताकडून अग्रस्थान हिरावून घेतील. दोन सामन्यांत भारताचे सहा तर म्यानमारचे चार गुण झाले आहेत. गटातील अव्वल संघ पुढील वर्षी मालदीवमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी आगेकूच करेल.
गुआमविरुद्ध दोन गोल करणारा भारताचा कर्णधार सुनील छेत्री सुरेख फॉर्मात असून देशातर्फे सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडण्यासाठी त्याला दोन गोलांची आवश्यकता आहे. ‘‘म्यानमारला हरविण्यासाठी आम्ही जिवाचे रान करणार आहोत. घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणारा कोणताही संघ धोकादायक ठरतो. त्यामुळे आम्हाला म्यानमारचे आव्हान कोणत्याही परिस्थितीत परतवून लावावे लागेल,’’ असे छेत्रीने सांगितले.

Story img Loader