पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांच्यानतर माजी फिरकीपटू सईज अजमलने भारतीय क्रिकेटवर भाष्य केले आहे. त्याने भारताचे जागतिक क्रिकेटवरील वर्चस्वाबाबत मत देताना पाकिस्तानची परिस्थितीही समोर आणली. अजमल म्हणाला, ”बीसीसीआयकडे भरपूर पैसा आहे. पैसा सर्वकाही आहे. त्यांना प्रायोजकही मिळतात. यामुळेच बीसीसीआय आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे.”
अजमलने एका खासगी टीव्ही वाहिनीशी संभाषणात त्याचे प्रसिद्ध फिरकी तंत्र ‘दुसरा’ बाबतही सांगितले. अजमलच्या या तंत्रावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बंदी घातली. तो म्हणाला, ”आयसीसीने भारतीय फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला माझ्यावर आरोप लावण्यापूर्वी सहा महिने गोलंदाजी करण्यास बंदी घातली होती. अश्विनला सहा महिने विश्रांती घेण्यास सांगण्यात आले, तर मला आणि मोहम्मद हफीजला बाजूला करण्यात आले.”
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि गोलंदाज हरभजन सिंग यांनाही त्यांच्या गोलंदाजीत अडचणी आल्याचा दावा अजमलने केला. तो म्हणाला, ”ते भारतातून आले आहेत आणि त्यांच्या मंडळाकडे पैसे, प्रायोजक आहेत. पैसा सर्वात वर आहे. यामुळेच त्याच्या खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या वादाला सामोरे जावे लागले नाही.”
अजमलपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांनीही जगातील क्रिकेटवर भारताचे नियंत्रण असल्याचे म्हटले होते. ”पैशामुळे बीसीसीआयला जे हवे ते घडते. न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तानला जे केले ते भारताला करण्याचे धाडस कोणताही देश करू शकत नाही”, असे इम्रान खान म्हणाले.
हेही वाचा – IPL 2021 : “तो स्वत: ला एक अपयशी…”, RCBच्या अपयशानंतर मायकेल वॉननं विराटच्या जखमेवर चोळलं मीठ!
याआधी पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांनीही आपले मत दिले होते. ते म्हणाले, ”आयसीसीला भारताकडून जास्तीत जास्त रक्कम मिळते. पीसीबीचे ५० टक्के बजेट आयसीसीच्या अनुदानातून येते. मला भीती वाटते, की जर भारताने निधी थांबवला तर पीसीबी कोसळू शकेल. कारण आयसीसीला पाकिस्तानकडून कोणताही निधी मिळत नाही.”