India has set a target of 399 runs against England : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ २५३ धावा करू शकला आणि भारताला पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात शुबमन गिलच्या शतकाच्या जोरावर २५५ धावा केल्या. इंग्लंडपुढे ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले.
भारतीय संघ दुसऱ्या डावात २५५ धावांवर गारद –
दुसऱ्या डावात भारतीय संघ २५५ धावांत गारद झाला. रेहान अहमदने अश्विनला बाद करून भारताचा डाव रोखला. आता इंग्लंडसमोर सामना जिंकण्यासाठी ३९९ धावांचे लक्ष्य आहे. या डावात भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक १०४ धावा केल्या. अक्षर पटेलने ४५ आणि रविचंद्रन अश्विनने २९ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने चार विकेट्स घेतल्या. रेहम अहमदला तीन, जेम्स अँडरसनला दोन आणि शोएब बशीरला एक विकेट मिळाली.
अकरा महिन्यानंतर शुबमनने झळकावले शतक –
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शुबमन गिलसाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती होती. मात्र शुबमन गिलने संयमाने फलंदाजी करत १३२ चेंडूत शतक झळकावले आणि भारताचा दुसरा डाव सावरला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि २ षटकार मारले. हे शुबमन गिलच्या कसोटी कारकीर्दीतील तिसरे शतक ठरले. शुबमनने यापूर्वी मार्च २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते.
हेही वाचा – IND vs ENG : जो रूटने इंग्लंडची वाढवली डोकेदुखी, हाताच्या बोटाला दुखापत झाल्याने सोडावे लागले मैदान
यादरम्यान त्याने २३५ चेंडूंचा सामना करताना १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १२८ धावांची खेळी केली होता. यानंतर खेळलेल्या १२ डावांमध्ये त्याची बॅट शांत राहिली. त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्याने १२ डावात १३, १८, ६, १०, २९*, २, २६, ३६, १०, २३, ०, ३४ धावा केल्या. हैदराबाद कसोटीत तो शून्यावर बाद झाला, त्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले.