India has won against Japan and will face Malaysia in the final : ११ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री चेन्नईच्या राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय हॉकी संघाने जपानचा ५-० असा पराभव केला. आता याच मैदानावर त्याचा सामना १२ ऑगस्ट २०२३ रोजी मलेशियाशी अंतिम सामना होणार आहे. मलेशियाने नेत्रदीपक कामगिरी करत गतविजेत्या दक्षिण कोरियाचा ६-२ असा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने केले १-१ गोल –
भारतीय गोलकीपर पीआर श्रीजेशसाठी हा विजय आणखी खास होता. कारण हा त्याचा ३०० वा सामना होता. भारताकडून आकाशदीप सिंग, कर्णधार हरमनप्रीत सिंग, मनदीप सिंग, सुमित आणि कार्ती सेल्वम यांनी गोल केले. भारताने पहिला क्वार्टर वगळता प्रत्येक क्वार्टरमध्ये गोल केले. चौथ्या क्वार्टरच्या ५१व्या मिनिटाला स्थानिक खेळाडू कार्ती सेल्वमने गोल केला. तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताकडून एक गोल झाला. सामन्याच्या ३९व्या मिनिटाला सुमितने भारतासाठी चौथा गोल केला.
भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोलची केली हॅट्ट्रिक –
याआधी दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने ३ गोल केले होते. दुसऱ्या क्वार्टरमध्ये प्रथम, १९व्या मिनिटाला आकाशदीपने मैदानी गोल केला. त्यानंतर २३व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ३०व्या मिनिटाला मनप्रीत सिंगच्या डिफ्लेक्शनवर मनदीप सिंगने मैदानी गोल करत भारताची स्कोअर ३-० असा केला. याआधी पहिल्या क्वार्टरमध्ये भारत आणि जपान या दोन्ही संघाला गोलचे खाते उघडता आले नव्हते.
मलेशियाकडून फैजल, शेलो, अबू आणि नजमी यांनी केले गोल –
पहिल्या उपांत्य फेरीबद्दल बोलायचे झाले तर, मलेशियासाठी फैजल सारी, शेलो सिल्व्हरियस, अबू कमाल अझराई आणि नजमी जझलान यांनी गोल केले. तसेच दक्षिण कोरियासाठी वू चेओन जी आणि कर्णधार जोंगह्यून जांग यांनी गोल केले. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी सकारात्मक सुरुवात केली. कोरियाने तिसऱ्याच मिनिटाला चेओन जीच्या माध्यमातून आघाडी घेतली, मात्र पुढच्याच मिनिटाला अजराईने मलेशियासाठी बरोबरी साधली.
यानंतरही दोन्ही संघांनी आक्रमक वृत्ती कायम ठेवली. मलेशियाने ९व्या मिनिटाला जझलानच्या माध्यमातून आघाडी घेतली, पण कोरियाला १४व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर देण्यात आला, ज्याचे रुपांतर गोलमध्ये करण्यात झांगने कोणतीही चूक केली नाही. दुसऱ्या क्वार्टरच्या चौथ्या मिनिटाला मलेशियाने पेनल्टी कॉर्नर मिळवला जो सारीने गोलमध्ये बदलला. दोन मिनिटांनंतर जझलानने पेनल्टी कॉर्नरमध्ये बदल करत मलेशियाला ४-२ अशी आघाडी मिळवून दिली.
हेही वाचा – Shakib Al Hasan : बीसीबीचा मोठा निर्णय! आशिया चषक आणि विश्वचषकासाठी नवीन कर्णधार केला नियुक्त
तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या क्वार्टरमध्ये दक्षिण कोरियाला पेनल्टी स्ट्रोकही मिळाला, मात्र जिहुन यांगचा फटका गोलरक्षक हाफिजुद्दीन ओथमानने अडवला. चौथ्या क्वार्टरमध्ये मलेशियाने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. सिल्व्हरियसने ४७व्या आणि ४८व्या मिनिटाला मलेशियाची आघाडी भक्कम केली. यानंतर दक्षिण कोरियाने पुनरागमन करण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु मलेशियाने त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत.