विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अखेर भारतानं पहिल्यांदाच दक्षिण अफ्रिकेविरुद्ध त्यांच्या देशात एकदिवसीय मालिका जिंकली आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये म्हणजे 1992मधल्या पहिल्या दौऱ्यापासून भारताने एकूण सहा दौरे केले. परंतु एकदाही भारताला एकदिवसीय मालिका जिंकता आली नव्हती. त्यामुळेच कसोटी मालिका हरूनही विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या या मालिका विजयाला वेगळंच महत्त्व आहे. एकदिवसाच्या रँकिंकमध्ये भारत पहिल्या स्थानावर असून दक्षिण अफ्रिकेला दक्षिण अफ्रिकेमध्ये नमवत भारताने आपली योग्यता सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे कप्तान विराट कोहलीने कप्तानपदाला साजेसा खेळ करत या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे.
दक्षिण अफ्रिकेमध्ये एकदिवसीय मालिका विजय मिळवणारा पहिला कप्तान ठरलेल्या विराटनं पाच सामन्यांमध्ये 429 धावा तडकावल्या असून यामध्ये दोन शतकांचा व एका अर्धशतकाचा समावेश आहे. तर कुलदीप यादवने 16 व यजुवेंद्र चहलने 14 बळी मिळवत गोलंदाजीची आघाडी भक्कम मिळवली. कालच्या सामन्यात आधी फारशी चमकदार कामगिरी करू न शकलेल्या रोहित शर्मानं शतक झळकावलं आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये चांगली धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. या ऐतिहासिक मालिका विजयापूर्वी भारताने दक्षिण अफ्रिकेमध्ये गेल्या 25 वर्षांमध्ये सहा दौरे केले आहेत. 1992च्या पहिल्या दौऱ्यामध्ये यजमानांनी भारताचा 5 -2 असा धुव्वा उडवला होता. त्यानंतर 1996 – 97 मध्ये तर भारताचा दक्षिण अफ्रिकेने 4 – 0 असा व्हाइटवॉश केला होता. 2000- 01 मध्ये केनयाचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेत अफ्रिकेने भारताला अंतिम सामन्यात धूळ चारली. तर 2006 – 07 मध्ये 4 – 0, 2010 – 11 मध्ये 3 – 2 व 2013 – 14 मध्ये 2 – 0 असा पराभव करत दक्षिण अफ्रिकेने एकदिवसीय मालिकेत हरवण्याचा धडाका कायम राखला होता.
विशेष म्हणजे या एकदिवसीय मालिकेपूर्वी झालेल्या सलग 42 मालिकांमध्ये दक्षिण अफ्रिकेने पाहुण्यांना धूळ चारली होती, हा घरच्या मैदानावर जिंकण्याचा स्वत:त एक विक्रम आहे. या विक्रमाला भारताच्या विजयामुळे खंड पडला आहे. सातत्यानं पहिल्या स्थानावर असलेली या भारताच्या विजयामुळे दुसऱ्या स्थानावर ढकलली गेली आहे.
अर्थात, दक्षिण अफ्रिकेच्या प्रमुख खेळाडुंना झालेल्या दुखापती भारताच्या पथ्यावर पडल्या. फाफ डु प्लेसीस, ए. बी. डिविलियर्स व क्विंटन डी कॉक दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहेत. अर्थात यामुळे भारताच्या विजयाचं श्रेय कमी होत नाही.
आता शेवटचा सामनाही जिंकत भारत ही मालिका 5 – 1 इतक्या फरकानं खिशात घालते की दक्षिण अफ्रिका हा सामना जिंकत आणि भारत ही मालिका 4 -2 अशा कमी फरकानं जिंकतो इतकंच बघायचं शिल्लक आहे.