नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत आणि ऑस्ट्रेलियन दौऱ्यात सरदारा सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ज्या प्रकारे खेळ केला, त्या कामगिरीची पुनरावृत्ती केल्यास भारताला चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची नामी संधी आहे, असे उद्गार ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार इडी ओकेनडेन याने काढले.
भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर ६ डिसेंबरपासून चॅम्पियन्स चषक स्पर्धेला सुरुवात होणार असून जगातील अव्वल आठ संघ जेतेपदासाठी एकमेकांशी झुंजणार आहेत. ‘‘भारतीय संघाच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली असून त्यांची कामगिरीही चांगली होत आहे. गेल्या महिन्यात आम्ही भारताविरुद्ध खेळलो, त्या वेळी हा संघ कोणत्याही संघाला नमवू शकतो, हे आमच्या लक्षात आले. भारतीय संघातील खेळाडू अनुभवी असून गेल्या दोन महिन्यांतील कामगिरीची पुनरावृत्ती केल्यास, घरच्या मैदानावर भारतीय संघ चॅम्पियन्स चषकाला गवसणी घालेल,’’ असे ओकेनडेन म्हणाला.
‘‘ऑस्ट्रेलियाला अव्वल खेळाडूंची अनुपस्थिती जाणवणार असली तरी या स्पर्धेसाठी आमची तयारी चांगली झाली आहे. आमच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे जेतेपद कायम राखण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सलग सहाव्यांदा चॅम्पियन्स चषकावर नाव कोरण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’’ असेही त्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा