ऑस्ट्रेलियाचे विजयाच्या हॅट्ट्रिकसह मालिका जिंकण्याचे मनसुबे; सामना जिंकण्यासाठी भारताच्या गोलंदाजांची कसोटी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीनशेपल्याड धावसंख्या उभारूनही खराब गोलंदाजीमुळे पहिले दोन्ही सामने भारताने गमावले आहेत. आता मालिका वाचवण्यासाठी तिसरा एकदिवसीय सामना जिंकण्याशिवाय भारतापुढे पर्याय नाही. गोलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असताना भारताची मदार अर्थातच फलंदाजांवर असणार आहे. गोलंदाजांकडून अपेक्षा करण्यापेक्षा फलंदाजांनी अधिक भार सांभाळत आणखी मोठी धावसंख्या उभारावी, अशी प्रांजळ कबुली टीकेच्या लक्ष्यस्थानी असलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिली होती. ऑस्ट्रेलियाने मात्र विजयाची हॅट्ट्रिक नोंदवून पाच सामन्यांची मालिका जिंकण्याचे मनसुबे आखले आहेत.

गतवर्षीच्या विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताची कामगिरी चांगली झालेली नाही. झिम्बाब्वे दौऱ्यावर मर्दुमकी गाजवल्यानंतर भारताने बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिका गमावल्या. आता सलग तिसऱ्या मालिकेतील पराभवाच्या उंबठय़ावर भारत आहे. मार्चमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत धोनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. परंतु लागोपाठच्या पराभवांमुळे त्याचे कर्णधारपद डळमळीत झाले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीनशे धावसंख्या उभारूनही पर्थ आणि ब्रिस्बेनला भारताने शरणागती पत्करली. गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोख पार पाडल्याशिवाय ही धावसंख्या कवडीमोल आहे, याची त्याला पुरती जाणीव आहे. मात्र फलंदाजांनी ३३०-३४० धावा कराव्यात, असे निर्देशच धोनीने दिले आहेत.

रोहित शर्मा आणि विराट कोहली सातत्यपूर्ण फलंदाजीचा नजारा पेश करीत आहेत. पर्थहून ब्रिस्बेनला त्यांच्या धावांची गती अधिक होती. मात्र अखेरच्या षटकांमध्ये भारताला अपेक्षित फलंदाजी करता आली नाही. अजिंक्य रहाणेनेसुद्धा आपली अचूक छाप पाडली. चौथ्या क्रमांकाला रहाणेने न्याय दिला, मात्र त्याच्या खेळीत ताकदीच्या फटक्यांचा अभाव असल्याचे धोनीने सांगितले. मनीष पांडेच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे घाईचे ठरेल. मात्र संघनिवडीचा पुनर्विचार झाल्यास गुरकीरत मानला संधी मिळू शकते. भारताच्या पाच गोलंदाजांच्या आक्रमणात मानचे साहाय्य मिळू शकेल.

फलंदाजीच्या फळीत रिशी धवनला पुन्हा संधी देणे धोनीला मान्य नाही. परंतु सूर हरवलेल्या शिखर धवनवर मात्र तो विश्वास व्यक्त करतो. डावखुरा सलामीवीर धवनचा फॉर्म ही चिंतेची बाब आहे. विश्वचषक स्पध्रेत हॅमिल्टनला आर्यलडविरुद्ध धवनने शतक झळकावले होते. त्यानंतर १३ एकदिवसीय सामन्यांत त्याला शतक साकारता आलेले नाही. धवनला वगळल्यास रहाणेला सलामीला संधी मिळेल. याशिवाय मान आणि पांडे दोघांनाही मधल्या फळीत खेळता येईल. मात्र धोनीच्या संकल्पनेतील ‘सर्वोत्तम संघ’ हा इतके बदल स्वीकारू शकणार नाही.

तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांवर धोनी विसंबून असेल. त्यामुळे मेलबर्नवर आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा दोघेही खेळतील. महत्त्वाच्या क्षणी झेल सोडणारा इशांत शर्मा यांच्यासह उमेश यादव आणि बरिंदर सरण वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील.

डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत मिचेल मार्श सलामीवीराची भूमिका चोख बजावत आहे. याशिवाय स्टीव्हन स्मिथ, जॉर्ज बेली फॉर्मात आहेत. गाबावर जॉन हॅस्टिंग्सने आपली गुणवत्ता दाखवली होती. त्यामुळे जोश हॅझलवूडची उणीव ऑस्ट्रेलियाला भासत नाही.

संघ

ऑस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, आरोन फिन्च, जॉर्ज बेली, जॉन हॅस्टिंग्स, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉल्कनर, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), जोएल पॅरिस, स्कॉट बोलँड, शॉन मार्श, केन रिचर्ड्सन, मिचेल मार्श.

भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/ यष्टीरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, गुरकीरत मान, रिशी धवन, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, उमेश यादव, बरिंदर सरण.

सामन्याची वेळ : सकाळी ८.५० वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी १, ३.