हॉकी या खेळात भारताने सुवर्ण दिन अनुभवले; पण गेल्या काही वर्षांत भारतीय हॉकीची होणारी घसरण अद्याप थांबलेली नाही. ऑलिम्पिकमधील आठ सुवर्णपदकांनंतर भारताने सर्वाधिक यश मिळवले ते आशियाई क्रीडा स्पर्धेत. जवळपास प्रत्येक आशियाई स्पर्धेत भारताने पदकाची कमाई केली. गेल्या वेळी गुआंगझाऊ आशियाई स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानणाऱ्या भारताने या वेळी सुवर्णपदकाचे लक्ष्य बाळगले आहे. महिलांमध्ये भारताला गेल्या वेळी रिकाम्या हाती मायदेशी परतावे लागले होते. त्यामुळे दोन्ही संघ पदकांची अपेक्षापूर्ती करतील का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
भारताने आशियाई स्पर्धेत आतापर्यंत १९६६ आणि १९९८मध्ये सुवर्णपदकांना गवसणी घातली आहे, तीसुद्धा बँकॉकमध्ये. त्यानंतर भारताने नऊ रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळवली आहेत. पाकिस्तानने सात वेळा, तर कोरियाने चार वेळा सुवर्णपदक पटकावले आहे. दक्षिण कोरिया यजमान असताना (१९८६, २००२) त्यांनी सुवर्णपदकावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर दक्षिण कोरियाला जेतेपदाची संधी अधिक आहे, असे म्हटले जात आहे. याआधी भारताने दक्षिण कोरियाला हरवल्यामुळे आणि पाकिस्तान संघ फॉर्मात नसल्यामुळे भारताच्या सुवर्णपदकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. इंच्योन आशियाई स्पर्धेद्वारे भारतीय पुरुष संघाला थेट ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रकुलमध्ये रौप्यपदक मिळवल्यामुळे भारतासाठी हा मार्ग खडतर असणार आहे; पण अशक्य नाही.
भारतीय महिला संघानेही पदक मिळवले तर त्यांना रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची संधी मिळणार आहे. मात्र इतिहास भारताच्या बाजूने नाही. १९८२मध्ये नवी दिल्लीत झालेल्या आशियाई स्पर्धेत महिला हॉकीचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला होता. त्यानंतर भारताला फक्त एकदाच सुवर्णपदक मिळवता आले आहे. भारतासमोर मुख्य अडथळा आहे तो चीन, दक्षिण कोरिया आणि जपानचा. या बलाढय़ संघांवर मात केली, तर भारतीय महिला संघही इतिहास घडवेल, अशी आशा आहे.
भारतीय संघ
पुरुष : गोलरक्षक : पी. आर. श्रीजेश. बचाव फळी : गुरबाज सिंग, बिरेंद्र लाकरा, रुपिंदर पाल सिंग, कोठाजित सिंग, व्ही. आर. रघुनाथ. मधली फळी : धरमवीर सिंग, सरदारा सिंग, दानिश मुज्तबा, चिंगलेनसाना सिंग, मनप्रीत सिंग. आघाडी फळी : रमणदीप सिंग, आकाशदीप सिंग, एस. व्ही. सुनील, गुरविंदर सिंग चंडी, निकिन थिमय्या.
महिला : गोलरक्षक : सविता. बचाव फळी : दीप ग्रेस इक्का, दीपिका, सुनीता लाकरा, नमिता टोप्पो, जसप्रीत कौर, सुशीला चानू, मोनिका. मधली फळी : रितू राणी, लिलिमा मिंझ, अमनदीप कौर, चंचनदेवी थॉकचॉम. आघाडी फळी : राणी रामपाल, पूनम राणी, वंदना कटारिया, नवज्योत कौर.
हॉकी : अपेक्षापूर्तीची आशा!
हॉकी या खेळात भारताने सुवर्ण दिन अनुभवले; पण गेल्या काही वर्षांत भारतीय हॉकीची होणारी घसरण अद्याप थांबलेली नाही. ऑलिम्पिकमधील आठ सुवर्णपदकांनंतर भारताने सर्वाधिक यश मिळवले ते आशियाई क्रीडा स्पर्धेत.
First published on: 17-09-2014 at 12:32 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India hockey team face big challenge from south korea in asian games