इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी होणारा तिरंगी क्रिकेट स्पध्रेतील अखेरचा साखळी सामना हा उपांत्य फेरीप्रमाणेच मानला जात आहे. या पाश्र्वभूमीवर भारताची फलंदाजी मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून रोहित शर्माच्या पुनर्वसनाकडे गांभीर्य लक्ष दिले जात आहे. मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीतून रोहित सावरत आहे.
दोन पराभव आणि एक पावसामुळे वाया गेलेला सामना यामुळे भारताला तिरंगी स्पध्रेतील आव्हान टिकवणे मुश्कील झाले आहे. रोहितच्या दुखापतीमुळे भारताच्या फलंदाजीवर परिणाम झाला आहे. अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर अद्याप स्थिरावलेला नाही. नव्या रणनीतीनुसार रोहित शिखर धवनच्या साथीने सलामीला उतरत आहे. परंतु धवन धावांसाठी झगडत आहे. रोहितच्या अनुपस्थितीत रहाणे सलामीला उतरला, तर रायुडूला तिसऱ्या स्थानावर बढती मिळाली.
भारतीय संघ व्यवस्थापनाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, रोहितची दुखापत गंभीर स्वरूपाची नसून विश्वचषकाच्या दृष्टीने त्याला चिंता करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. रोहित लवकरच पूर्ण तंदुरुस्त होईल. सोमवारी पावसामुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना वाया गेला. परंतु रोहितने नेटमध्ये हलका सराव केला. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात रोहितला खेळवण्याच्या आशा बळावल्या आहेत. धवनच्या फलंदाजीच्या समस्येमुळे रोहित आणि रहाणे यांना सलामीला पाठवण्याचा पर्यायसुद्धा संघापुढे उपलब्ध असेल. हे दोघे मधल्या फळीतसुद्धा खेळतात. परंतु धवन आपल्या कारकीर्दीत सलामीच्या स्थानावरच खेळला आहे.

Story img Loader