जमजंग डेरूने केलेल्या राष्ट्रीय विक्रमासह भारताने पंधराहून अधिक सुवर्णपदकांची लयलूट केली आणि राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत सोमवारी वर्चस्व गाजविले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सोमवारी या स्पर्धेला सुरुवात झाली. जमजंगने युवा विभागाच्या ५६ किलो गटात स्नॅचमध्ये १०७ किलो वजन उचलून स्वत:च जानेवारीत नोंदविलेला १०३ किलो हा राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने या गटातील क्लीन व जर्कमध्ये १३५ किलो व एकूण २४२ किलो वजन उचलीत प्रथम स्थान मिळविले. तसेच त्याने कुमार विभागातही या तीनही प्रकारांत सोनेरी कामगिरी केली. पुरुषांच्या ५६ किलो गटात सुखेन डे या आंतरराष्ट्रीय अनुभवी खेळाडूने स्नॅच (१०८ किलो), क्लीन व जर्क (९६ किलो) तसेच एकूणात २४३ किलो वजन उचलून तीन सुवर्णपदकांची कमाई केली. या गटात जमजंग याला तीनही प्रकारांत रौप्यपदकांची कमाई झाली.
महिलांच्या ४४ किलो गटात टी. प्रियदर्शनीने स्नॅच (५३ किलो), क्लीन व जर्क (७५ किलो) तसेच एकूणात १२८ किलो वजन उचलून सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक केली. ४८ किलो गटात मोहिनी चव्हाण हिने या तीनही प्रकारांत सोनेरी यश मिळविले. तिने स्नॅचमध्ये ६१ किलो, क्लीन व जर्कमध्ये ८५ तर एकूणात १२८ किलो वजन उचलीत तीन सुवर्णपदकांची कमाई केली. पूजा गुप्ताने तीन रौप्यपदक मिळविली. कुमार मुलींच्या गटात मात्र श्रीलंकेच्या डी. डी. अबीसेकराला तीन सुवर्णपदके मिळाली. भारताच्या पूजा गुप्ताला या विभागातही तीन रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले. महिलांच्या वरिष्ठ गटात संजीथा चानूने क्लीन व जर्कमध्ये १०१ किलो, तर एकूणात १८२ किलो वजन उचलीत दोन सुवर्णपदके जिंकली. स्नॅचमध्ये मात्र तिला रौप्यपदक मिळाले. तिचीच सहकारी एस. मीराबाई चानू हिने सोनेरी कामगिरी केली. तिला क्लीन व जर्कमध्ये रौप्यपदक मिळाले.
या स्पर्धेचे उद्घाटन पुण्याचे महापौर दत्तात्रेय धनकवडे, राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष दातोओंग पोहइंग व सरचिटणीस पॉल कॉफा यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक महासंघाचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष वीरेंद्रप्रसाद बैश्य, उपाध्यक्ष सहदेव यादव उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा