संधी ही चोरपावलाने येते, परंतु निसटून जाते तेव्हाच तिचे अनन्यसाधारण महत्त्व पटते. सकाळच्या सत्रात जेव्हा न्यूझीलंडचे तीन फलंदाज धावफलकावर तिशी झळकेपर्यंत तंबूत परतले होते, तेव्हा भारताच्या गोलंदाजांकडे वर्चस्व प्राप्त करण्याची संधी चालून आली होती. परंतु तिचे सोने करण्यात भारतीय गोलंदाज कमी पडले. हा ढासळणारा बुरूज सावरत ब्रेन्डन मॅक्क्युलम आणि केन विल्यम्सन पहाडासारखे मैदानावर उभे राहिले. ‘रब ने बना दी जोडी..’ची अनुभूती न्यूझीलंड संघाला तिथेच आली. या दोघांच्या झुंजार शतकांमुळे आणि महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने दमदार मजल मारली.
ईडन पार्कवर प्रारंभीच्या हाराकिरीनंतर न्यूझीलंडने आपल्या समर्थ फलंदाजीचा प्रत्यय घडवला आणि दिवसअखेर ४ बाद ३२९ धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा कर्णधार मॅक्क्युलम (१४३ खेळत आहे) आणि कोरे अँडरसन (४२ खेळत आहे) मैदानावर होते.
मॅक्क्युलमने कर्णधारपदाला साजेसा खेळ करीत आपल्या कसोटी कारकीर्दीतील आठवे तर भारताविरुद्ध तिसरे शतक झळकावले. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार ठोकून मॅक्क्युलमने आपले शतक साजरे केले. त्याला तोलामोलाची साथ देणाऱ्या विल्यम्सनने (११३) आपले पाचवे कसोटी शतक १० चौकार आणि दोन षटकारांनिशी साकारले.
दडपणाखाली खेळताना भारताच्या गोलंदाजीत सातत्याचा अभाव तीव्रतेने जाणवला. याचप्रमाणे क्षेत्ररक्षकांनी तब्बल चार झेल सोडले. हेच सारे न्यूझीलंडच्या पथ्यावर पडले. त्यामुळेच ३ बाद ३० अशी पडझड झाल्यानंतर विल्यम्सन आणि मॅक्क्युलम यांनी चौथ्या विकेटसाठी २२१ धावांची अनमोल भागीदारी रचली.
त्याआधी, वेगवान गोलंदाजांना अनुकूल ईडन पार्कच्या खेळपट्टीवर भारताने नाणेफेक जिंकल्यावर अपेक्षेप्रमाणे प्रथम गोलंदाजी स्वीकारली. उपाहारापूर्वीचे पहिले सत्र न्यूझीलंडसाठी प्रतिकूल आणि भारतासाठी अनुकूल ठरले. सलामीवीर पीटर फुल्टन (६) आणि हमिश रुदरफोर्ड (६) पाठोपाठ फॉर्मात असलेल्या रॉस टेलरने (३) घोर निराशा केली. पहिल्या सत्राअखेरीस न्यूझीलंडच्या धावफलकावर जेमतेम ५४ धावा जमा होत्या. परंतु दुसऱ्या सत्रात विल्यम्सन आणि मॅक्क्युलम यांनी २७ षटकांत १२५ धावांची भागीदारी करीत हे सत्र न्यूझीलंडसाठी सकारात्मक ठरवले.
नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत ४-० असे वर्चस्व संपादन करणाऱ्या न्यूझीलंडने पहिल्या कसोटीतसुद्धा तितक्याच ताकदीने आपल्या खेळाचे प्रदर्शन केले आहे. सीमारेषा जवळ असल्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी मग आरामात धावा काढल्या, तर भारतीय गोलंदाज बळी मिळवण्यासाठी झगडताना दिसले. इशांत शर्मा (६२ धावांत २ बळी) सर्वात यशस्वी ठरला. त्याने आपल्या ५४व्या कसोटीत दीडशे बळींचा टप्पाही गाठला. झहीर खानने ९८ धावांत २ बळी घेतले, तर मोहम्मद शमीची झोळी रिकामी राहिली. टणक आणि उसळणाऱ्या खेळपट्टीवर रवींद्र जडेजा (८१ धावांत ० बळी) प्रभावहीन ठरला. याचप्रमाणे धोनीने रोहित शर्मा आणि विराट कोहलीलाही आजमावून पाहिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा