सलामीच्या स्थानासाठी मी, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे असे तीन पर्याय उपलब्ध होणे हे भारतीय संघासाठी सुदैव असल्याचे शिखर धवनने सांगितले. विश्वचषक स्पर्धेआधी  संघाला स्थिर सलामी मिळणे आवश्यक असून आम्हा तिघांच्या रूपात योग्य पर्याय मिळाला आहे, असे त्याने सांगितले.
रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने अजिंक्य रहाणेला सलामीवीर म्हणून खेळायची संधी मिळाली. दोन शतके झळकावत अजिंक्यने आपण या स्थानासाठी लायक असल्याचे सिद्ध केले. दुखापतीतून सावरलेला रोहित शर्मा दिमाखदार पुनरागमनासाठी आतुर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कटक येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय लढतीत शिखर धवनने शतक झळकावले. त्यामुळे सलामीच्या स्थानासाठी या तिघांमध्ये चुरस रंगणार आहे.
तो पुढे म्हणाला, ‘‘पहिल्यांदा फलंदाजी असो किंवा धावांचा पाठलाग असो, स्थिर सलामी ही संघाची गरज आहे. आम्ही तिघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहोत ही संघासाठी चांगली गोष्ट आहे.’’ सलामीचा सहकारी म्हणून रोहित आणि अजिंक्य यापैकी चांगला कोण, यावर शिखरने उत्तर देणे टाळले. मला दोघांसह फलंदाजी करायला आवडते. त्या दोघांनाही माझ्यासोबत फलंदाजी करणे आवडत असावे. त्या दोघांची आपापली स्वतंत्र शैली आहे. माझा साथीदार कोण असावा हा निर्णय संघव्यवस्थापनाचा असेल, असे धवनने सांगितले.