ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली आणि भारत यांचे एक वेगळेच नाते आहे. भारतात कधी तो क्रिकेटसाठी, कधी ख्यातनाम गायिका आशा भोसलेंसोबत गाण्यासाठी, कधी अन्य एखाद्या संगीताच्या अभियानात, तर कधी सामाजिक उपक्रमात तो हमखास आढळतो. आता तो पुन्हा आपल्या आवडत्या देशात आला आहे.. आयपीएलसाठी. वसिम अक्रमच्या अनुपस्थितीत यंदा गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदाची धुरासुद्धा तो सांभाळत आहे. क्रिकेट, संगीत आणि भारत यांच्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या ब्रेट ली याच्याशी केलेली ही खास बातचीत –
तू भारतात वारंवार येत असतो. ही ओढ कशामुळे निर्माण झाली?
गेली १३ वष्रे क्रिकेट या धाग्यामुळे मी भारताशी जोडला गेलो; परंतु येथील पुरस्कर्त्यां कंपन्या, संगीत आदी अनेक कारणांस्तव मला भारतात येण्याची अनेकदा संधी मिळाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील माणसे आणि त्यांची संस्कृती यामुळे मला या देशाची ओढ निर्माण झाली. भारत हे माझे दुसरे घर आहे. त्यामुळे वर्षांतून किमान ३-४ वेळा तरी भारतात जाण्याचा माझा प्रयत्न असतो. मी कोलकातासाठी आयपीएल खेळतो. आयपीएल ट्वेन्टी-२० स्पध्रेच्या निमित्ताने दर वर्षीची भारतयात्रा ठरलेली असते. याचप्रमाणे भारतातील संगीत अभियान आणि सामाजिक उपक्रमातसुद्धा मी सहभागी होतो.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काही साम्य दिसते?
या दोन्ही देशांत अनेक गोष्टींत साम्य आहे. या दोन्ही देशांतील माणसे सहृदयी आणि आपुलकी जपणारी आहेत. याचप्रमाणे क्रिकेट, संगीत आणि चित्रपट यांविषयी दोन्ही देशांच्या नागरिकांचे विलक्षण प्रेम आहे.
भारतीय खाद्यपदार्थाविषयी काय वाटते?
भारत दौऱ्यावर असताना हॉटेल्समध्ये उपलब्ध असणाऱ्या खाद्यपदार्थाच्या सेवनावर र्निबध असतात; परंतु येथील विविध राज्यांमधील अनेक पदार्थ आपला ठसा जपून आहेत. या पदार्थाची निर्मितीप्रक्रिया समजून घेण्यात मला रस असतो. ऑस्ट्रेलियात मला मासे खायला खूप आवडतात. खेकडा आणि कोळंबी हे माझे सर्वात आवडते खाद्य आहे.
भारतासंदर्भातील एखादी आठवण..?
अनेक आठवणी मनात आहेत. पण भारतात मी पहिल्यांदा आलो त्या वेळची आठवण मात्र नक्कीच वेगळी आहे. सरावाला हजेरी लावण्यासाठी मी घाईने टुकटुक पकडली. मला आता ते कोणते शहर होते ते आठवत नाही, परंतु प्रसंगी नक्कीच आठवतोय. त्या टुकटुकच्या चालकाने एक गाणे लावले होते, ते आजही माझ्या कानात घुमते आहे. ‘मुकाबला..’ असे त्या गाण्याचे बोल होते. चालकाने मला सांगितले, हे सध्या फार लोकप्रिय गाणे आहे. त्या गाण्याने मी इतका मंत्रमुग्ध झालो की मी त्याला विचारले, ही सीडी विकत देणार का? तो क्षणभर आश्चर्याने माझ्याकडे पाहातच राहिला. पण फक्त १० रुपयांत त्याने मला सीडी विकत दिली. १० वर्षांनंतर भारतातील एका चर्चात्मक कार्यक्रमात त्या गाण्याचे बोल मी गायले होते.
भारतात तुझे काही सामाजिक कार्य सुरू आहे..
होय, मी भारतात एका ‘मिवसिक फाऊंडेशन’करिता काम करतो. तळागाळातल्या मुलांपर्यंत संगीत पोहोचवण्याचे हे कार्य आहे. आता मुंबई परिसरातील झोपडपट्टी भागांमध्ये सातहून अधिक मिवसिक केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. शिक्षणाच्या मुख्य धारेत या मुलांना आणण्यासाठी हा आमचा उपक्रम राबविला जात आहे.
तुझ्यामधील क्रिकेटपटू आणि संगीततज्ज्ञ यांच्यातील परस्परसंबंध तू कसा मांडशील?
संगीत आणि क्रिकेट हे दोन्ही प्रांत माणसांना जोडतात. याचप्रमाणे लोकांचे मनोरंजन करताना साऱ्या सीमा भेदतात.
क्रिकेटनिमित्त होणाऱ्या तुझ्या प्रवासाचा संगीतावर किती प्रभाव आहे?
प्रवास आणि संगीत या दोन्ही गोष्टी ज्ञानात भर घालत असतात. जितका मी प्रवास करतो, तितक्या अधिक प्रमाणात मी विविध प्रकारचे संगीत आणि संगीताची वाद्ये समजून घेतो. त्यांची वैशिष्टय़े मला अधिक भावतात. अनेक ठिकाणच्या संगीताला श्रीमंत, ऐतिहासिक आणि भौगोलिक वारसा आहे.
तुझ्या बँडविषयी तू भविष्यातील कोणत्या योजना आखल्या आहेस?
गेली काही वष्रे वेळ काढायला फार कठीण गेले; परंतु या वर्षीच्या उत्तरार्धात वेळ काढून भारत दौऱ्याची योजना आखत आहे. याशिवाय आयपीएल संपल्यानंतर मी काही महिने संगीत आणि गीतलेखनाकडे लक्ष केंद्रित करीन.
वर्षभर ऑस्ट्रेलियात अनेक संगीत महोत्सव होतात. यांपैकी कोणत्या महोत्सवांना तू आवर्जून जातोस?
तुम्हाला कोणत्या प्रकारचे संगीत आवडते यावर ते अवलंबून असते. हे संगीत महोत्सव काही विशिष्ट ठिकाणी होतात, त्यावरूनच त्यांची ओळख निर्माण झाली आहे. टॅमवर्थ देशीय संगीत महोत्सव हा माझ्या मते आवर्जून हजेरी लावण्यासारखा असतो. सिडनीच्या रॉयल वनस्पती उद्यानात हा संगीत महोत्सव होतो. या ठिकाणी संगीताप्रमाणेच अनेक मनोरंजक उपक्रम होतात.
ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन विभागाकडून नुकताच तुला ‘फ्रेंड ऑफ ऑस्ट्रेलिया’ (ऑस्ट्रेलिया मित्र) हा बहुमान देण्यात आला. ऑस्ट्रेलियातील तुझी आवडती पर्यटनस्थळे कोणती?
न्यू साऊथ वेल्समधील दक्षिणेचा किनारा, पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील किंबर्ले भाग, दक्षिण ऑस्ट्रेलियातील बरोस्सा दरी आणि ऑस्ट्रेलियाचे समुद्रकिनारे मला सुटी घालविण्यासाठी अधिक आवडतात. या देशातील पर्यटनस्थळे आणि संस्कृती देशोदेशी पसरविण्याचे कार्य सध्या मी करीत आहे.
ऑस्ट्रेलियातील कोणत्या मैदानाशी तुझे भावनिक नाते आहे?
सिडनी क्रिकेट ग्राऊंड हे गेली १९ हून अधिक वष्रे माझे क्रिकेटमधील माहेरघर आहे. अनेक महान क्रिकेटपटूंचे या मैदानाशी नाते आहे. याचप्रमाणे ते जागतिक क्रिकेटमधील एक सर्वोत्तम स्टेडियम मानले जाते. त्यामुळेच क्रिकेटमधील या ऐतिहासिक स्थळाचे सान्निध्य लाभल्याचा मला अभिमान आहे.
तुझ्या बालपणाविषयी काही सांगशील?
न्यू साऊथ वेल्सच्या दक्षिण किनारपट्टी भागात माझे बालपण गेले. तिथे काही निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि मासे पकडण्याची ठिकाणी आहेत. माझ्या शाळेच्या दिवसांतील अनेक सुट्टय़ा मी या किनाऱ्यांवर मासे पकडण्यात, राष्ट्रीय उद्यानांमध्ये आणि रात्रीच्या चांदण्यांमध्ये झोपून घालविल्या आहेत. माझे कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत अनेक विशेष आठवणी मी जपल्या आहेत. नुसा, सनशाइन कोस्ट, क्विन्सलॅण्ड या ठिकाणी मला आतासुद्धा सुट्टी घालवायला आवडते.