ब्राझीलमधील साल्व्हाडोर दा बाहिमा येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या कनिष्ठ जागतिक कुस्ती अजिंक्यपद (फ्री स्टाइल) स्पध्रेसाठी भारताचा आठ जणांचा चमू सज्ज झाला आहे. ११ ते १६ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या स्पध्रेत भारतीय संघात आशियाई सुवर्णपदक विजेता रवी कुमार (५५ किलो) याच्याकडून पदकाच्या अधिक आशा आहेत. भारतीय संघाचा मुकाबला १३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
म्यानमार येथे झालेल्या कनिष्ठ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पध्रेत फ्री स्टाइल प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा रवी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. रवीसह या स्पध्रेसाठी २०१४च्या कनिष्ठ जागतिक कुस्ती स्पध्रेत फ्री स्टाइल प्रकारात कांस्यपदक जिंकणारा प्रवीण (८४ किलो) हाही संघात सहभागी आहे. या स्पध्रेसाठी निवडण्यात आलेल्या आठ खेळाडूंपैकी सात जणांनी गत महिन्यात म्यानमार येथे झालेल्या आशियाई स्पध्रेत पदकांची कमाई केली आहे.
‘‘फ्री स्टाइल प्रकारातील खेळाडूंची सर्वोत्तम तयारी झालेली आहे. त्याचा नजराणा त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पध्रेत सादर केला आणि आठपैकी सात जणांनी पदके जिंकली होती,’’ असे मत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘म्यानमार येथून मायदेशी परतल्यानंतर संघाने कसून सराव केला आहे. प्रशिक्षकांनी विशेष मेहनत घेत त्यांच्या तंत्रात सुधारणा करण्यावर भर दिला आहे. आशा करतो आमचा संघ जास्तीत जास्त पदके जिंकेल.’’
भारतीय संघ :
भारत पाटील (५० किलो), रवी कुमार (५५ किलो), अमित (६० किलो), विकास (६६ किलो), दिनेश (७४ किलो), प्रवीण (८४ किलो), रुबल जीत सिंग (९६ किलो), दुश्यंत (१२० किलो)

Story img Loader