दक्षिण कोरियामधील इन्चॉन शहरात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी जाहीर झालेल्या भारतीय कबड्डी संघात महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे. पुरुष संघात सांगलीच्या नितीन मदनेला प्रथमच संधी देण्यात आली आहे, तर महिला संघात मुंबई उपनगरची अभिलाषा म्हात्रे आणि पुण्याची किशोरी शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय हौशी कबड्डी असोसिएशनने प्रो-कबड्डी लीग संपताच लगेच दुसऱ्या दिवशी भारतीय संघ जाहीर केला आहे. प्रो-कबड्डीमध्ये आपल्या कामगिरीने लक्ष वेधणाऱ्या खेळाडूंचाच भारतीय पुरुष संघात भरणा आहे. या स्पध्रेत बंगाल वॉरियर्सकडून खेळणाऱ्या मदनेने आपल्या चतुरस्र चढायांनी छाप पाडली होती. भारताचे दोन्ही संघ भोपाळच्या साई केंद्रात ५ ते २१ सप्टेंबदरम्यान होणाऱ्या सराव शिबिरानंतर २३ सप्टेंबरला नवी दिल्लीहून इन्चॉनला प्रयाण करतील.
२०१२मध्ये झालेल्या विश्वचषक कबड्डी स्पध्रेत आणि गतवर्षी इन्चॉनलाच झालेल्या आशियाई इन्डोअर आणि मार्शल आर्ट्स क्रीडा स्पध्रेतील विजेत्या भारतीय संघातील अभिलाषाचा या संघात समावेश आहे. २०१०मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेत पुण्याच्या दीपिका जोसेफचा भारतीय संघात समावेश होता, परंतु दुखापतीमुळे तिला यंदा मुकावे लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा