Saqlain Mushtaq on BCCI: भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना म्हटला की, जगभरातील क्रिकेट रसिकांचे त्याकडे लक्ष असते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट स्पर्धा होत नसल्यामुळे आयसीसीच्या स्पर्धांमध्येच हे दोन संघ एकमेकांसमोर आलेले पाहायला मिळतात. त्यामुळेच आयसीसी विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान भारत-पाकिस्तान सामन्यांची पर्वणी क्रिकेट चाहत्यांना अनुभवता येते. आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात होत आहे. २३ फेब्रुवारी रोजी भारत वि. पाकिस्तान सामना होणार आहे. पण सामन्याआधीच वातावरण तापायला लागले आहे. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक याने “भारताला आता धडा शिकवायची वेळ आली आहे”, असे विधान केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकलेन मुश्ताक असे का म्हणाला?

चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान पद यंदा पाकिस्तानकडे आहे. मात्र भारत आपले सामने दुबईत खेळणार आहे. भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे दोन देशांत सामने खेळवण्याची व्यवस्था करण्यात आली. बीसीसीआयने पाकिस्तानात आपला संघ पाठविण्यास नकार दिला होता. बीसीसीआय, पीसीबी आणि आयसीसी यांच्यात झालेल्या दीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

पाकिस्तानमधील एका वाहिनीवर चर्चा करत असताना सूत्रसंचालकाने भारत आणि पाकिस्तानबद्दल प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सकलेन मुश्ताक म्हणाला, यांचे नखरे कधी संपतच नाहीत. तरीही आम्ही त्यांचे गुण गात बसतो. आमच्या देशातील मुले म्हणतात, विरोट कोहली, जसप्रीत बुमराह आमच्या देशात येऊ द्या. त्यांना खेळताना आम्हाला पाहायचे आहे. प्रत्येक पाकिस्तानी हे आर्जव करतोय, पण यांचे नखरे मात्र कधी संपतच नाहीत.

सकलेन मुश्ताक पुढे म्हणाला, “मी न्यूझीलंड संघाला फिरकीचे प्रशिक्षण देत होतो. नुकतेच (नोव्हेंबर २०२४) न्यूझीलंडने भारताला तीन सामन्यात पराभूत करत व्हाईटवॉश दिला. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, भारत वि. न्यूझीलंड सामने होत असताना मला व्हिसा देण्यात खूप अडचणींचा सामना करावा लागला. स्पर्धा सुरू होण्याच्या पाच महिन्यांपूर्वी मला व्हिसासाठी अर्ज करण्यास सांगितले. ऑनलाईन अर्ज केल्यानंतरही मला बऱ्याच अडचणी आल्या. मला दोन-तीन तास रांगेत उभे राहावे लागले. तीन महिने यातच गेले. शेवटी मला पीसीबीचा प्रस्ताव आला आणि मी व्हिसा नाकारला.”

४८ वर्षीय सकलेन मुश्ताकने या चर्चेत भारताविरोधात बरीच गरळ ओकली. तो म्हणाला, “भारतीय लोकांमध्ये समजूतदारपणा येणार माहीत नाही. टाय वैगरे लावून थोडी फार इंग्रजी बोलून या लोकांना वाटते ते सभ्य झाले आहेत. सर्व काही त्यांनाच समजते. छोट्या छोट्या गोष्टींवर तक्रार करत बसतात. यांना पाकिस्तानात खेळायचे नाही. त्यांना स्वतःचा झेंडाही पाकिस्तानमध्ये लावायचा आहे. बीसीसीआयचे वागणे विचित्र आहे. यांना धडा शिकवला पाहीजे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India ko sabak sikhana chahiye says former pakistan spinner saqlain mushtaq kvg