भारत दौऱ्यावरील प्रारंभीच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांत हार पत्करणारा वेस्ट इंडिजचा संघ कोचीच्या पहिल्या अग्निपरीक्षेसाठी सज्ज झाला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व टिकवून ठेवणाऱ्या भारतीय संघाने पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या दृष्टीने तयारी अभियानाला सुरुवात केली आहे. त्यामुळे बुधवारपासून सुरू होणाऱ्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दुबळ्या विंडीजपुढे भारताचे पारडे जड मानले जात आहे.
२००६-०७ पासून भारताने कॅरेबियन संघाविरुद्ध पाच मालिका जिंकल्या आहेत. हीच विजयी आकडेवारी कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल. स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि जादूई फिरकी गोलंदाज सुनील नरिन यांच्याशिवाय भारतात आलेला वेस्ट इंडिजचा संघ तसा हतबलच जाणवत आहे. चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत नरिनच्या गोलंदाजीच्या शैलीवर ‘संशयास्पद’ असल्याचा ठपका ठेवला गेल्याने त्याने भारत दौऱ्यावरून माघार घेतली आहे, तर गेल दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट असले तरी क्रिकेटरसिक मात्र सामन्याचा आनंद लुटण्यासाठी उत्सुक आहेत.
कोचीत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारताने विजय मिळवला होता, तर जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाला हरवले होते. त्यामुळे अनुकूल मैदानावर १-० असा विजयारंभ करणे भारतीय संघाला अजिबात कठीण जाणार नाही. आगामी विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर खेळाडू आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करतील.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये समतोल आहे. निवड समितीने दुखापतग्रस्त रोहित शर्माऐवजी मुरली विजयला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे शिखर धवनसोबत विजय किंवा अजिंक्य रहाणे यापैकी कोण सलामीला उतरेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. धावांचे इमले बांधण्यासाठी विराट कोहलीला भारतीय वातावरणात पुरेशी साथ मिळू शकेल. सुरेश रैना, अंबाती रायुडू आणि धोनी यांच्यामुळे भारताची मधली फळी मजबूत आहे.
चेन्नई सुपर किंग्जकडून धोनीच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी करणाऱ्या मोहित शर्माकडून भारताला मोठय़ा अपेक्षा असतील. याशिवाय भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यासारख्या हरहुन्नरी गोलंदाजांचा भारताच्या वेगवान माऱ्यात समावेश आहे. तसेच अमित मिश्रा आणि रवींद्र जडेजा या अनुभवी गोलंदाजांवर भारताच्या फिरकीची मदार असेल. त्यामुळे १९ वर्षीय डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला अंतिम संघात स्थान मिळवणे अवघड जाईल.
वेस्ट इंडिज संघाने नुकताच बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला आहे, त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव मुळीच नाही. तसेच विंडीजच्या १५ पैकी ७ खेळाडूंना भारतीय वातावरणाची पुरेपूर माहिती आहे. ते आयपीएल किंवा चॅम्पियन्स लीग खेळले आहेत. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये डॅरेन सॅमीकडून कर्णधारपद ड्वेन ब्राव्होकडे सोपवण्यात आले. त्या वेळी भारतातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका विंडीजने १-२ अशी गमावली होती. ब्राव्होला भारताविरुद्ध विजयाचे स्वप्न पाहण्यासाठी खास योजना आखावी लागणार आहे. डॅरेन सॅमी, ड्वेन ब्राव्हो आणि किरॉन पोलार्ड या अनुभवी फलंदाजांवर ब्राव्होची मदार
असेल.
जेरॉम टेलरच्या खात्यावर ९८ एकदिवसीय बळी जमा असून, तो शतकी टप्पा ओलांडण्याची चिन्हे आहेत. टेलर संघात परतल्यामुळे केमार रोच आणि रवी रामपॉल यांचा समावेश असलेला विंडीजचा वेगवान मारा अधिक ताकदवान झाला आहे. मात्र नरिनशिवाय त्यांच्या फिरकीच्या चिंता वाढल्या आहेत. डावखुरा फिरकी गोलंदाज सुलेमान बेन नरिनची पोकळी भरण्याचा प्रयत्न करील.

संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, उमेश यादव, मुरली विजय, कुलदीप यादव.
वेस्ट इंडिज : ड्वेन ब्राव्हो (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, जेसॉन होल्डर, लिऑन जॉन्सन, किरॉन पोलार्ड, दिनेश रामदिन, रवी रामपॉल, केमार रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, मार्लन सॅम्युएल्स, लेंडल सिमॉन्स, ड्वेन स्मिथ, जेरॉम टेलर.
सामन्याची वेळ : दुपारी २.३० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.