जागतिक अॅथलेटिक अजिंक्यपद स्पध्रेत अखेरच्या दिवशी ओ. पी. जैशा आणि सुधा सिंग यांच्याकडून असलेल्या पदकाच्या आशाही फोल ठरल्यामुळे भारताला रिकाम्या झोळीने माघारी परतावे लागणार आहे. मॅरेथॉनपटू जैशाने १८वे स्थान पटकावताना स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला, तर १९व्या स्थानावर आलेल्या सुधा सिंगने पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित केला. अखेरच्या दिवशी याच गोड बातमींवर भारताला समाधान मानावे लागले.
२०१४च्या आशियाई स्पध्रेत १५०० मीटर शर्यतीतील कांस्यपदक विजेत्या जैशाने येथे २ तास, ३४ मिनिटे, ४३ सेकंदांची वेळ नोंदवून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. १८व्या स्थानावर आलेल्या जैशाने याआधी जानेवारी महिन्यात पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये २ तास, ३७ मिनिटे, २९ सेकंदांची वेळ नोंदवली होती. एक स्थान मागे राहिलेल्या सुधानेही २ तास, ३५ मिनिटे, ३५ सेकंदांत शर्यत पूर्ण करून रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित केला. ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवण्यासाठी २ तास, ४२ मिनिटांची वेळ ठरवण्यात आली होती. ३२ वर्षीय जैशाने याआधीच ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे. ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये सहभागी झालेल्या ललिता बाबरने मॅरेथॉनमधून माघार घेतली. इथोपियाच्या मॅरे डिबाबाने २ तास, २७ मिनिटे, ३५ सेकंदांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक, तर केनियाच्या हेलॅप किप्रोपने २ तास, २७ मिनिटे, ३६ सेकंदांची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. बहरेनच्या इयुनाइस जेपकिरुईला (२:२७:३९) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
अखेरच्या दिवशीही भारताला रित्या हातावरच समाधान मानावे लागले. फिफा विश्वचषक स्पध्रेनंतर सर्वाधिक लोकप्रियता लाभलेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पध्रेत ललिता बाबरने भारताकडून सर्वोत्तम कामगिरी केली. तिने ३००० मीटर स्टिपलचेस प्रकारात ८वे स्थान पटकावत स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडला होता. तसेच स्टिपलचेस प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. त्यानंतर जैशाच्या कामगिरीचा उल्लेख करायला हवा. या स्पध्रेत पदकाची आशा असलेल्या थाळीफेकपटू विकास गौडा आणि गोळाफेकपटू इंदरजीत सिंग यांनी मात्र अंतिम फेरीत निराशा केली. गौडाला नवव्या, तर इंदरजीतला ११व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. ४ बाय ४०० मीटर रिले प्रकारात महिला संघाला आणि ८०० मीटर शर्यतीत टिंटू लुकाला पहिल्याच हिटमध्ये गाशा गुंडाळावा लागला.
संग्रहित लेख, दिनांक 31st Aug 2015 रोजी प्रकाशित
भारताची पदकाची झोळी रिकामी!
जागतिक अॅथलेटिक अजिंक्यपद स्पध्रेत अखेरच्या दिवशी ओ. पी. जैशा आणि सुधा सिंग......
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 31-08-2015 at 01:16 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India loose medal