बबिता, विनेशसह चार कुस्तीपटू पराभूत
जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी गेलेल्या भारतीय संघाला गेल्या काही दिवसांपासून वाईट बातम्यांचा सामना करावा लागत असून गुरुवारी पुन्हा एकदा त्याच्या पदरात निराशाच पडली. भारताच्या तीन महिला कुस्तीपटूंना या स्पर्धेत अपयश आले आहे. यामध्ये भरवशाच्या समजल्या जाणाऱ्या बबिता कुमारी आणि विनेश फोगट यांचा समावेश आहे.
२०१२ साली झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये बबिताने (५३ कि.) कांस्यपदकाची कमाई केली होती, पण या वेळी मात्र तिची घोडदौड उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आली. तर अन्य भारतीय कुस्तीपटूंचे आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आले. विनेश आणि नवज्योत कौर यांना पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
बबिताने या स्पर्धेत चांगली सुरुवात केली होती. कोलंबियाच्या आइडे मेरीओरी कुइरो मुनोझला बबिताने १७-४ असे पराभूत केले. त्यानंतर बबिताने स्पेनच्या करिमा सँचेझ रामिसला ९-० असे नमवले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत जाण्यासाठी बबिताने जर्मनीच्या निना हेम्मरचा पाडाव केला. पण उपांत्यपूर्व फेरीत मात्र बबितावर चीनच्या क्सूएचून झाँगने ६-२ असा विजय मिळवला.
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या विनेशवर (४८ कि.) यावेळी सर्वाचा आशा होत्या, पण तिने साफ निराशाच केली. उत्तर कोरियाच्या किम ह्य़ोन-ग्योंगने विनेशला ८-४ असे पराभूत केले. नवजोतला (६९ कि.) पहिल्याच फेरीत मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले. नवजोतला युक्रेनच्या अलिना स्टॅडनिक मखानियाला ८-० असे नमवले.
ग्रीको रोमन प्रकारातील ८५ किलो वजनी गटामध्ये मनोज कुमारला पहिल्याच फेरीत फिनलँडच्या रामी अँटेरो हिएतानिएमीकडून १०-० असा पराभव स्वीकारावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा