आफ्रिकेची २ बाद ११ अशी अवस्था
कसोटी झटपट निकाली व्हावी या दृष्टीने खेळपट्टय़ा तयार करण्यात आल्याचा पुनप्रत्यय नागपूरच्या जामठा मैदानावरही आला. पहिल्याच दिवशी असमान उसळी आणि चेंडू भरपूर वळणाऱ्या खेळपट्टीवर भारताने रडतखडत २१५ धावांची मजल मारली. पहिल्या डावातही ही धावसंख्या पुरेशी ठरेल का अशी चर्चा सुरू असतानाच अवघ्या नऊ षटकांत दक्षिण आफ्रिकेच्या दोन फलंदाजांना माघारी धाडत भारतीय संघाने पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व राखले.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्टुअर्ट बिन्नीच्या जागी अमित मिश्राला तर वरुण आरोनच्या ऐवजी रोहित शर्माला संघात समाविष्ट करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने कायले अबॉटच्या जागी सिमोन हार्मेरला संधी दिली. डेल स्टेन खेळू शकणार नसल्याने दुखापतीतून सावरलेला मॉर्ने मॉर्केल परतला.
शिखर धवन आणि मुरली विजय यांनी सावधपणे सुरुवात केली. हे दोघे उपाहारापर्यंतचे सत्र खेळून काढणार असे वाटत असतानाच कामचलाऊ गोलंदाज डीन एल्गरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा धवनचा प्रयत्न फसला. दुसऱ्या स्पेलमध्ये बदललेल्या रणनीतीसह गोलंदाजी करणाऱ्या मॉर्केलने मुरली विजयला पायचीत केले. त्याने ४० धावा केल्या. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने संयमी खेळ करीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र सिमोन हार्मेरने पुजाराला पायचीत करीत ही जोडी फोडली. मॉर्केलच्या गोलंदाजीवर ड्राइव्ह करण्याचा रहाणेचा आततायी प्रयत्न पूर्णत: फसला. त्याला केवळ १३ धावा करता आल्या. उजव्या यष्टीबाहेर मारा करीत विराटला मोहात पाडण्याचा मॉर्केलचा प्रयत्न यशस्वी झाला आणि डेन व्हिलासने त्याचा झेल टिपला. त्याला २२ धावा करता आल्या. अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतल्याने संधी मिळालेल्या रोहित शर्माने अर्धा तास चिकाटी दाखवली. मात्र सिमोन हार्मेरने त्याला डी’व्हिलियर्सकडे झेल देण्यास भाग पाडले. ६ बाद १२५ अशा स्थितीतून वृद्धिमान साहा आणि रवींद्र जडेजा यांनी सातव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. साहाच्या तुलनेत आक्रमक पवित्रा स्वीकारलेल्या जडेजाला रबाडाने त्रिफळाचीत केले. त्याने ६ चौकारांसह ३४ धावा केल्या. साहाला बाद करीत हार्मेरने भारताला अडचणीत टाकले. त्याने १०६ चेंडूत ३२ धावांची संयमी खेळी केली. साहा बाद झाल्यानंतर भारताचे तळाचे फलंदाज विशेष योगदान देऊ शकले नाहीत आणि भारताचा डाव २१५ धावांतच संपुष्टात आला. ७०व्या षटकादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा आधारस्तंभ मॉर्ने मॉर्केल दुखापतग्रस्त झाला. उर्वरित डावात त्याने गोलंदाजी केली नाही.
पहिल्याच दिवशी फिरकीरंग अंगीकारणाऱ्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडणे अपेक्षित होते आणि घडलेही तसेच. चौथ्याच षटकात अश्विनने स्टॅनिअन व्हॅन झीलला तंबूत परतावले. नाइट वॉचमन म्हणून आलेल्या इम्रान ताहिरचा रवींद्र जडेजाने त्रिफळा उडवला.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची २ बाद ११ अशी स्थिती आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अजूनही २०४ धावांनी पिछाडीवर आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा