भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठीची शर्यत आता रंगताना दिसत आहे. संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा करार विश्वचषकानंतर संपुष्टात आला. मात्र आगामी विंडीज दौऱ्यासाठी बीसीसीआयने शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. ३० जुलैपर्यंत बीसीसीआयने संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. शास्त्री आणि त्यांचे सहकारी या पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरले आहेत. मात्र रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ दोनवेळा विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी हरला, त्यामुळे संघाला आता बदलाची गरज आहे असं वक्तव्य माजी खेळाडू रॉबिन सिंह याने केलं आहे. रॉबिन सिंहने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे.

“भारतीय संघाच्या सध्याच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ सलग दोनवेळा विश्वचषकात उपांत्य फेरीमधून बाहेर पडला. टी-२० क्रिकेटमध्येही भारताची कामगिरी फारशी चांगली होत नाहीये. कधीकधी प्रशिक्षकाने स्वतःला खेळाडूंच्या जागी ठेऊन विचार करणं गरजेचं असतं. खेळाडूंच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून नव्याने रणनिती आखण गरजेचं आहे. जर तुम्हाला खेळ कळत असेल तर ही गोष्ट सहज करु शकता. त्यामुळे २०२३ विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला बदलाची गरज आहे.” रॉबिन सिंह ‘द हिंदू’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

२००७-०९ काळात रॉबिन सिंह भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. याचसोबत भारतीय संघाच्या १९ वर्षाखाली संघाला रॉबिन सिंह यांनी यशस्वीपद्धतीने मार्गदर्शन केलं आहे. इंडियन प्रिमीअर लिग स्पर्धेत मुंबई इंडियन्स सारख्या यशस्वी संघाला प्रशिक्षण देण्याचा अनुभवही रॉबिन सिंह यांच्या पदरात आहे. रॉबिन सिंह यांच्यासह माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मुडी, श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन हे देखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत असल्याचं कळतंय, मात्र याबद्दल अजुन अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.

Story img Loader