Asian Games 2023: २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धे २०२३मध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताने आपली उत्कृष्ट अशी लय कायम ठेवत ११व्या दिवशी सकाळी भारताने दोन पदके जिंकली. पहिले पदक ३५ किलोमीटर शर्यतीत आणि दुसरे पदक तिरंदाजीमध्ये होते. पहिल्या १० दिवसांत ६९ पदके जिंकणाऱ्या भारताने ११व्या दिवशी ७१चा जादुई आकडा गाठला आणि सर्व जुने विक्रम मोडीत काढले.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी कधीही आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ७१ पदके जिंकली नव्हती. ज्योती सुरेखा आणि ओजस देवतळे या जोडीने मिश्र तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारताला ७१वे पदक मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताची कामगिरी कशी राहिली आहे ते जाणून घेऊया.
आशियाई क्रीडा स्पर्धा या खेळांना १९५१ मध्ये सुरू झाली. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा या दिल्ली येथे झाल्या होत्या आणि यजमान भारताने एकूण ५१ पदके जिंकली. यामध्ये १५ सुवर्ण, १६ रौप्य आणि २० कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर होता. मात्र, यानंतर भारताला ५० पदके मिळविण्यासाठी ३१ वर्षे वाट पाहावी लागली. १९८२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १३ सुवर्णांसह ५७ पदके जिंकली होती. १९५४ मध्ये भारताने एकूण १७ पदके जिंकली आणि १९५८ मध्ये केवळ १३ पदके जिंकली होती, तर १९५१ मध्ये भारताने १५ सुवर्ण जिंकले.
असा एक प्रसंग १९९० मध्ये आला होता, जेव्हा भारत पदकतालिकेत पहिल्या १० मध्येही नव्हता. या वर्षीही भारताकडे केवळ २३ पदके होती. त्यात एकच सुवर्णपदक होते. १९९८ पासून भारताच्या कामगिरीत सुधारणा झाली आणि २००६ मध्ये प्रथमच भारताने घरापासून दूर ५० हून अधिक पदके जिंकली. तेव्हापासून भारत सतत ५० हून अधिक पदके जिंकत आहे. २०१० मध्ये, भारताने ६५ पदके जिंकली आणि सर्वाधिक पदकांचा नवा विक्रम केला. २०१८ मध्ये, भारताने यात आणखी सुधारणा केली आणि ७० पदके जिंकली. आता २०२३ मध्ये, भारताने ७१ हून अधिक पदके जिंकली आहेत आणि इतर अनेक स्पर्धांमध्ये खेळाडूंनी अंतिम फेरी गाठून पदके मिळवली आहेत. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडू नवी यशोगाथा लिहिणार हे निश्चित आहे. यावेळी शंभरी पार करण्याचा नारा देत भारतीय खेळाडू हांगझाऊकडे रवाना झाले होते. अशा स्थितीत यंदा भारताच्या झोळीत १०० पदके येतील अशी अपेक्षा आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी | ||||
वर्ष | सुवर्ण | रौप्य | कांस्य | एकूण पदके |
१९५१ | १५ | १६ | २० | ५१ |
१९५४ | ५ | ४ | ८ | १७ |
१९५८ | ५ | ४ | ४ | १३ |
१९६२ | १० | १३ | १० | ३३ |
१९६६ | ७ | ३ | ११ | २१ |
१९७० | ६ | ९ | १० | २५ |
१९७४ | ४ | १२ | १२ | २८ |
१९७८ | ११ | ११ | ६ | २८ |
१९८२ | १३ | १९ | २५ | ५७ |
१९८६ | ५ | ९ | २३ | ३७ |
१९९० | १ | ८ | १४ | २३ |
१९९४ | ४ | ३ | १६ | २३ |
१९९८ | ७ | ११ | १७ | ३५ |
२००२ | ११ | १२ | १३ | ३६ |
२००६ | १० | १७ | २६ | ५३ |
२०१० | १४ | १७ | ३४ | ६५ |
२०१४ | ११ | १० | ३६ | ५७ |
२०१८ | १६ | २३ | ३१ | ७० |
२०२३ | १६ | २७ | ३१ | ७४* |