इंग्लंडविरुद्ध 4-1 असा मानहानीकारक पराभव स्वीकारूनही भारतानं आयसीसी टेस्ट टीम रँकिंगमध्ये अव्वल स्थान कायम राखलं आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या रँकिंगनुसार भारताचा इंग्लंडने पाचव्या व शेवटच्या कसोटीत पराभव केल्यानंतर भारताचे गुण 125 वरून घसरून 115 झाले आहेत. मात्र, दुसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण अफ्रिकेचे 106 गुण असल्यामुळे भारताचं अव्वल स्थान अबाधित राहिलं आहे.
कसोटी मालिका सुरू होण्याआधी इंग्लंड 97 गुणांसह पाचव्या स्थानावर होता. मालिकेत चार कसोटी विजय मिळवल्यामुळे इंग्लंडच्या खात्यात 8 गुणांची भर पडली असून 105 गुणांसह इंग्लंडला चौथ्या स्थानावर बढती मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया व दक्षिण अफ्रिका दोघांचेही 106 गुण आहेत, त्यात अफ्रिका दुसऱ्या व ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहेत. इंग्लंड पुढे गेल्यामुळे 102 गुण असलेल्या न्यूझीलंडची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.
With a 4-1 series win, England move up to fourth in the @MRFWorldwide ICC Test Team Rankings!
इंग्लंडने भारताचा पाचव्या व अंतिम कसोटीत 118 धावांनी पराभव केला व मालिका 4-1 अशी जिंकली. इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी 464 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले होते, जे पेलता न आलेल्या भारताचा डाव 345 धावांवर आटोपला. मालिका पराजयानंतरही कसोटी मालिका कशी झाली हे आपण बघितलं असून भारताला प्रचंड बदल करण्याची गरज नसल्याचे मत कप्तान विराट कोहलीनं व्यक्त केलं आहे.