श्रीलंकेकडून पराभूत झाल्यामुळे यजमान भारतीय संघावर साखळी गटातच गारद होण्याची वेळ ओढवली असून पराभवाच्या कटू आठवणी बाजूला सारत आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी भारतीय संघाला आहे. सातव्या स्थानासाठीच्या आणि स्वाभिमानासाठीच्या या लढतीत भारतासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान आहे.
वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने विश्वचषकाची दमदार सुरुवात केली. मात्र त्यानंतर इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारताचे आव्हान साखळी गटातच संपुष्टात आले. इंग्लंडच्या शालरेट एडवर्ड्सने शतकी खेळी साकारली. इंग्लंडने दिलेले आव्हानात्मक लक्ष्य पेलताना भारताच्या हरमनप्रीत कौरने शानदार शतकी खेळी साकारली होती. मात्र अन्य फलंदाजांची साथ न मिळाल्याने भारताचा पराभव झाला. पुढच्या लढतीत भारतीय गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे श्रीलंकेने २८३ धावांची मजल मारली. भारतीय संघाला हे लक्ष्य गाठता आले नाही. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत भारताला गोलंदाजीत प्रचंड सुधारणा करावी लागेल. पॉवरप्लेच्या दरम्यान प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी धावांची लूट केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत शिस्तबद्ध गोलंदाजी करण्याचा गोलंदाजांचा मानस असेल. मुख्य फलंदाजांना आलेले अपयश भारताच्या पराभवाचे कारण ठरले. पाकिस्तानविरुद्ध या चुका टाळण्याची संधी फलंदाजांना मिळणार आहे.
दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान संघाचे सामने मुंबईहून कटकला हलवण्यात आले. मात्र कटकमध्ये पाकिस्तानच्या नशिबी पराभवच आला. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तगडय़ा संघांसमोर पाकिस्तानची अवस्था बिकट झाली. बिस्माह मारुफ या पाकिस्तानच्या एकमेव फलंदाजाला सन्मानजनक कामगिरी करता आली आहे. कर्णधार साना मिरकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत. आधीचे तिन्ही सामने मुंबईत खेळल्याने भारतीय संघाला कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवरील खेळपट्टीशी जुळवून घ्यावे लागणार आहे. साखळी गटातच पराभव झाल्याने पुढच्या विश्वचषकात भारतीय संघाला पात्रता फेरीचा अडथळा पार करत मुख्य फेरी गाठावी लागणार आहे.