हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष हॉकी संघाने अखेरीस आपलं ऑलिम्पिकमधलं स्थान निश्चीत केलं आहे. भुवनेश्वर शहरात पार पडलेल्या सामन्यात भारताने रशियाचा ७-१ ने धुव्वा उडवला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने रशियाची झुंज ४-२ अशी मोडून काढली होती. या तुलनेत शनिवारचा सामना एकतर्फी झाला. एकूण गोल फरकांमध्ये ११-३ च्या फरकाने भारतीय संघाने बाजी मारत टोकियोचं तिकीट पक्क केलं आहे.

अ‍ॅलेक्स सोब्लोस्कीने पहिल्याच मिनीटाला गोल करत रशियाला आघाडी मिळवून दिली. सुरुवातीच्याच सत्रात पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघासाठी हा धक्का होता. यानंतर पहिलं सत्र रशियाने आपली आघाडी कायम ठेवण्यात यश मिळवलं. मात्र दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच ललित उपाध्यायने गोल करत भारताला बरोबरी मिळवून दिली. यानंतर भारतीय संघाने सामन्यात मागे वळून पाहिलंच नाही. रशियन बचावफळीला खिंडार पाडत भारताच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंनी रशियन गोलपोस्टवर हल्ले चढवले.

भारताकडून आकाशदीप सिंह, निलकांत शर्मा, रुपिंदर सिंह आणि अमित रोहिदास यांनी गोल झळकावत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र होण्याची भारतीय हॉकी संघाची ही २० वी वेळ ठरली आहे. आतापर्यंत भारतीय संघाच्या खात्यात ८ सुवर्णपदकं जमा आहेत. त्यामुळे आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत ग्रॅहम रिड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader