पर्थ : विराट कोहली हा मी पाहिलेला सर्वात परिपूर्ण भारतीय फलंदाज आहे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपल यांनी भारताच्या तारांकित फलंदाजाची स्तुती केली. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीत कोहलीने दडपणाखाली अप्रतिम ८२ धावांची खेळी करताना भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला होता. तंत्रशुद्ध आणि कलात्मक फलंदाजी करून कोहलीने ज्याप्रकारे प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवर हल्ला चढवला, तसा यापूर्वीच्या काळातील दिग्गजांनाही करता आला नसता, असे त्या खेळीचे चॅपल यांनी वर्णन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘कोहली हा मी पाहिलेला सर्वात परिपूर्ण भारतीय फलंदाज आहे. इतरांपेक्षा वेगळे काही तरी करण्याचे धैर्य आणि बुद्धिमत्ता ही सर्वोत्तम खेळाडूंमध्येच असते. कोहलीमध्ये ती आहे. कोहली वगळता केवळ टायगर पतौडी यांच्याबाबत आपल्याला हे बोलता येईल,’’ असे चॅपल यांनी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रातील स्तंभलेखात लिहिले.

‘‘कोहलीच्या खेळीतून फलंदाजीतील कला दिसून आली. त्याच्या खेळीने ट्वेन्टी-२० क्रिकेटचेही महत्त्व सिद्ध केले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही कलात्मक खेळी होतात. क्रिकेटच्या या प्रकाराला केवळ मनोरंजन म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही,’’ असेही चॅपल यांनी लिहिले. ‘‘कोहली हा इतरांपेक्षा वेगळा खेळाडू आहे, हे आपल्याला ठाऊक होते. मात्र, गेल्या काही वर्षांत त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. या सगळय़ा पार्श्वभूमीवर कोहलीने केलेल्या खेळीचे विशेष महत्त्व आहे,’’ असे चॅपल यांनी नमूद केले.