Champions Trophy India National Anthem Played in AUS vs ENG Match: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील चौथा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये खेळवला जात आहे. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीनंतर दोन्ही संघ सामन्यासाठी सज्ज झाले. सामना सुरू होण्यापूर्वी खेळणाऱ्या दोन्ही संघांचे ध्वज आणि संपूर्ण संघ मैदानात राष्ट्रगीतासाठी उपस्थित राहिले. त्यावेळेस मैदानावर मोठा घोळ झाल्याचे पाहायला मिळाले.

खरं तर सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यापूर्वी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात आले तेव्हा स्टेडियममध्ये भारत देशाचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. मैदानावर अचानक ‘जन-गण-मन’ सूर ऐकू येताच स्टेडियममध्ये एकच गोंधळ उडाला.

पाकिस्तान क्रिकेट व्यवस्थापनाची ही चूक ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताच्या दरम्यान घडली. इंग्लंडचे राष्ट्रगीत आधी वाजवले गेले आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत सुरू होणार होते. पण ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी काही सेकंदांनी ‘भारत भाग्यविधाता…’ असे भारताच्या राष्ट्रगीताचे शब्द ऐकू आले आणि चूक कळताच राष्ट्रगीत घाईघाईने थांबवण्यात आले आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत सुरू करण्यात आले.

पाकिस्तान व्यवस्थापनाकडून मोठी घोडचूक झाली. महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील एकही सामना लाहोरच्या मैदानावर खेळणार नाहीय. फक्त लाहोरच काय भारताचा संघ पाकिस्तानातच येणार नसून सर्व सामने हायब्रिड मॉडलमुळे दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता, त्यानंतर आयसीसीने भारताचे सर्व सामने दुबईत घेण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत मोठा प्रश्न निर्माण होत आहे की, भारताला पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळायचा नसतानाही भारताचे राष्ट्रगीत कसे वाजवले गेले?

चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान मॅनेजमेंटच्या चुकांबद्दल चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, इतर सर्व प्रतिस्पर्धी संघांचे झेंडे कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर असताना फक्ता भारतीय ध्वज का फडकवला गेला नाही, असे प्रश्न उपस्थित झाले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) या मुद्द्यावर प्रश्न विचारत स्पष्टीकरण मागण्यात आले होते.

दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या भारताच्या सामन्यादरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ब्रॉडकास्ट बँडमधून ‘पाकिस्तान’ वगळण्यात आल्याने पीसीबीने नाराजी व्यक्त केली होती. इतर सर्व सामन्यांमध्ये “चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तान” असा संपूर्ण लोगो इंग्रजी भाषेत होता. मात्र भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात फक्त “चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५” असा लोगो दिसत होता.

पीसीबीने आयसीसीला पत्र लिहून स्पष्टीकरणाची मागणी केली होती. याच्या प्रतिसादात, जागतिक क्रिकेट संस्थेने ब्रॉडकास्टरच्या बाजूने तांत्रिक त्रुटी आल्याचे आयसीसीने सांगितले होते, असे वृत्त ESPNCricinfoने दिले होते. आगामी सामन्यांमध्ये अशी चूक पुन्हा होणार नाही, अशी ग्वाही आयसीसीने पाकिस्तानला दिली. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात भारतीय प्रसारकांच्या व्हिज्युअलमध्ये संपूर्ण ब्रॉडकास्ट बँड दाखवण्यात आला.

Story img Loader