भारतामधील मूलभूत सुविधांबाबत ‘फिफा’च्या शिष्टमंडळाने समाधान प्रकट केले आहे. २०१७मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे यजमानपद उत्तमपणे सांभाळण्याची क्षमता भारतामध्ये आहे. फक्त अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) योजनाबद्ध पद्धतीने या स्पध्रेसाठी सज्ज होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, असे मत सदर शिष्टमंडळाने प्रकट केले आहे.
‘‘१७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी करण्याची क्षमतात भारतात आहे. या स्पध्रेमुळे देशातील युवावर्गात फुटबॉलची मोठी लाट येऊ शकेल,’’ अशी आशा फिफाच्या स्पर्धा संयोजन समितीचे प्रमुख इनाकी अल्वारेझ यांनी सांगितले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने निवडलेल्या आठ ठिकाणांपैकी नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमची फफाच्या शिष्टमंडळाने बुधवारी पाहणी केली. परंतु एआयएफएफच्या सदस्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या शिष्टमंडळाशी संवाद साधू दिला नाही. परंतु तरीही अल्वारेझ यांनी मोजक्या शब्दांमध्ये भारताच्या समर्थतेविषयी आपले मत व्यक्त केले.
‘‘आम्ही गेले आठवडाभर भारतातील पाच शहरांचा दौरा केला. आतापर्यंतचा अनुभव हा अतिशय चांगला आणि सकारात्मक आहे. स्पध्रेसाठी आवश्यक मूलभूत सुविधा आणि व्यवस्थापन त्यांच्याकडे आहे. आमची दिशा योग्य आहे,’’ असे अल्वारेझ यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘आम्ही मूलभूत सुविधा, स्टेडियम, ड्रेसिंग रूम, मैदान, टीव्ही प्रक्षेपण आणि अन्य सुविधा यांसारख्या अनेक गोष्टी गांभीर्याने पाहिल्या. ही एक-दोन दिवसांची नव्हे तर मोठी प्रक्रिया आहे. अनेक महिने किंवा वष्रे प्रत्येक स्टेडियम आणि सुविधांचा अभ्यास करावा लागेल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा