अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने तीन बळी मिळवत छाप पाडली. परंतु भारतीय संघ तिसऱ्या सामन्यातही शुक्रवारी अपयशी ठरला. त्यामुळे यजमान न्यूझीलंडने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे.
तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकांत सर्व बाद २७९ अशी धावसंख्या उभारली. सलामीवीर सब्भीनेनी मेघना (६१), शफाली वर्मा (५१) आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा (नाबाद ६९) यांच्या अर्धशतकांनी भारताच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. मग न्यूझीलंडची सुरुवात २ बाद १४ अशी खराब झाली. परंतु अॅमी सॅटरवेट (५९) आणि अमिलिया कर (६७) यांच्या १०३ धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडचा डाव सावरला. मग आणखी तीन फलंदाज तंबूत परतल्यामुळे न्यूझीलंडची ३५व्या षटकात ६ बाद १७१ अशी अवस्था झाली. परंतु लॉरेन डाऊनच्या नाबाद ६४ धावांमुळे न्यूझीलंडने या सामन्यात निसटता विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक
भारत : ४९.३ षटकांत सर्व बाद २७९ (दीप्ती शर्मा नाबाद ६९, सब्भीनेनी मेघना ६१; हन्ना २/५२, रोसमेरी मैर २/४३) पराभूत वि. न्यूझीलंड : ४९.१ षटकांत ७ बाद २८० (अमिलिया कर ६७, लॉरेन डाऊन नाबाद ६४, अॅमी सॅटरवेट ५९; झुलन गोस्वामी ३/४७)
‘पराभवांची चिंता नाही’
भारतीय महिला संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील चारही सामने गमावले आहेत. मात्र, या पराभवांची प्रशिक्षक रमेश पोवार यांना चिंता वाटत नसून निराशाजनक कामगिरीला विलगीकरणाचा अतिरिक्त कालावधी कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘‘आम्हाला सराव करण्यासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी मिळाला. न्यूझीलंड दौऱ्याच्या तयारीसाठी इतका कमी कालावधी पुरेसा नाही,’’ असेही पोवार म्हणाले.