आज न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या सामन्यात भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य

India New Zealand ODI Series इंदूर : न्यूझीलंडविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजयासह मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल. तसेच या सामन्यात भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज पहिल्या दोन सामन्यांपेक्षा चांगली कामगिरी करतील, अशी संघ व्यवस्थापनाला अपेक्षा असेल.

भारतीय संघाने पहिल्या दोनही सामन्यांत सरशी साधत मालिकेत विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारताला संघात प्रयोग करण्याची संधी आहे. पहिल्या दोन सामन्यांत कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीवीरांनी चमकदार कामगिरी केली, मात्र त्यांना इतर फलंदाजांची फारशी साथ मिळालेली नाही. विराट कोहली दोनही सामन्यांत लवकर बाद झाला. त्यामुळे त्याच्यासह इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंडय़ा यांचा मोठी खेळी करण्याचा प्रयत्न असेल. भारतीय संघ फलंदाज रजत पाटीदारला पदार्पणाची संधी देण्याचा विचार करू शकेल.

गोलंदाजीत बदल अपेक्षित असून मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देऊन वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि लेग-स्पिनर यजुवेंद्र चहल यांना अंतिम ११ मध्ये स्थान मिळू शकेल. तसेच भारताकडे वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदला संधी देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
दुसरीकडे, न्यूझीलंडचा एकदिवसीय मालिकेची विजयी सांगता करण्याचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडला ट्रेंट बोल्स आणि टीम साऊदी यांनी कमी जाणवते आहे. मात्र युवा खेळाडू अखेरच्या सामन्यात आपली कामगिरी उंचावतील अशी न्यूझीलंडला आशा असेल.

वेळ : दुपारी १.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदूी (संबंधित एचडी वाहिन्या)

Story img Loader