पहिल्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर १२ धावांनी निसटता विजय
पीटीआय, हैदराबाद
India New Zealand ODI series सलामीवीर शुभमन गिलने (१४९ चेंडूंत २०८ धावा) आपली गुणवत्ता व प्रतिभा सिद्ध करताना केलेल्या द्विशतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर १२ धावांनी सरशी साधली. मायकल ब्रेसवेलच्या (७८ चेंडूंत १४०) झंझावाती खेळीमुळे न्यूझीलंडला विजयाची संधी निर्माण झाली होती. मात्र, अखेरीस मुंबईकर शार्दूल ठाकूरने ब्रेसवेलला पायचीत पकडत भारताला निसटता विजय मिळवून दिला.
हैदराबाद येथे झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३४९ अशी विशाल धावसंख्या उभारली. त्यानंतर अडखळत्या सुरुवातीनंतर न्यूझीलंडने विजयासाठी झुंज दिली. मात्र, अखेरीस न्यूझीलंडचा डाव ४९.२ षटकांत ३३७ धावांत संपुष्टात आल्याने भारताने सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
गेल्या काही काळापासून गिलबाबत बरीच चर्चा केली जात आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवनला गेल्या काही काळापासून धावांसाठी झगडावे लागत होते. त्यामुळे त्याने एकदिवसीय संघातील स्थान गमावले आणि त्याच्या जागी गिलला सलामीला संधी देण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला. गिलने सातत्यपूर्ण कामगिरी करत हा विश्वास सार्थ ठरवला होता. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध त्याने द्विशतकी खेळी साकारत आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थानाकरिता आपली दावेदारी अधिकच भक्कम केली आहे.
या सामन्यात गिल आणि कर्णधार रोहित शर्मा (३८ चेंडूंत ३४) यांनी भारताच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. रोहित लयीत दिसत होता. मात्र, वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनरच्या गोलंदाजीवर तो माघारी परतला. तसेच गेल्या चारपैकी तीन सामन्यांत शतक करणारा विराट कोहली (८) आणि इशान किशन (५) यांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. यानंतर गिलने सूर्यकुमार यादव (२६ चेंडूंत ३१) आणि हार्दिक पंडय़ा (३८ चेंडूंत २८) यांच्या साथीने अर्धशतकी भागीदाऱ्या रचत भारताचा डावाला आकार दिला. तसेच अखेरच्या षटकांत गिलने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने एकदिवसीय कारकीर्दीतील तिसरे शतक ८७ चेंडूंत, तर पहिले द्विशतक १४५ चेंडूंत पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत १९ चौकार व ९ षटकारांची आतषबाजी केली.
३५० धावांच्या अवघड आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. फिन अॅगलन (३९ चेंडूंत ४०) आणि कर्णधार टॉम लॅथम (४६ चेंडूंत २४) यांचा अपवाद वगळता आघाडीच्या व मधल्या फळीतील फलंदाजांना फारसे योगदान देता न आल्याने न्यूझीलंडची ६ बाद १३१ अशी स्थिती होती. यानंतर ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर (४५ चेंडूंत ५७) या डावखुऱ्या फलंदाजांच्या जोडीने अप्रतिम फलंदाजी केली. त्यांनी १६२ धावांची भागीदारी रचत न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, मोहम्मद सिराजने सँटनर आणि शिपले यांना एकाच षटकात बाद करत न्यूझीलंडला अडचणीत टाकले. मग ब्रेसवेलने न्यूझीलंडला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या षटकात २० धावांची आवश्यकता असताना ब्रेसवेलने शार्दूलच्या गोलंदाजीवर एक षटकार मारला. दुसरा चेंडू वाइड गेला. मात्र, त्यानंतर शार्दूलने ब्रेसवेलला पायचीत पकडत न्यूझीलंडचा डाव संपुष्टात आणला. ब्रेसवेलने आपल्या झुंजार १४० धावांच्या खेळीत १२ चौकार व १० षटकार मारले.
गिलच्या सर्वात जलद हजार धावा
न्यूझीलंडविरुद्धच्या द्विशतकी खेळीदरम्यान शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा पार केला. त्याने हा टप्पा पार करण्यासाठी केवळ १९ डाव घेतले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद हजार धावा करण्याचा विक्रम गिलने आपल्या नावे केला. त्याने विराट कोहली आणि शिखर धवन यांना मागे टाकले. कोहली आणि धवनने २४ डावांमध्ये हजार धावा पूर्ण केल्या होत्या.हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा गिल पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी या मैदानावरील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (१७५) नावे होता.
संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत ८ बाद ३४९ (शुभमन
गिल २०८, रोहित शर्मा ३४; डॅरेल मिचेल २/३०) विजयी वि. न्यूझीलंड : ४९.२ षटकांत सर्वबाद ३३७ (मायकल ब्रेसवेल १४०, मिचेल सँटनर ५७; मोहम्मद सिराज ४/४६, कुलदीप यादव २/४३, शार्दूल ठाकूर २/५४)