वृत्तसंस्था, बंगळूरु

पहिल्या डावातील ‘नीचांकी नामुष्की’नंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांना कडवी झुंज देण्यात यशस्वी ठरले. कर्णधार रोहित शर्मा (६३ चेंडूंत ५२ धावा), विराट कोहली (१०२ चेंडूंत ७०) आणि सर्फराज खान (७८ चेंडूंत नाबाद ७०) या त्रिकुटाच्या झुंजार खेळींमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला आता दमदार पुनरागमनाची संधी निर्माण झाली आहे.

बंगळूरु येथे सुरू असलेल्या या सामन्यात भारताला पहिल्या डावात ४६ धावांत गुंडाळणाऱ्या न्यूझीलंडने ४०२ धावांची मजल मारली आणि तब्बल ३५६ धावांची आघाडी मिळवली. डावखुऱ्या रचिन रवींद्रने (१५७ चेंडूंत १३४) अप्रतिम फलंदाजी करत न्यूझीलंडला भक्कम स्थितीत पोहोचवले. मात्र, मोठ्या पिछाडीचे दडपण न घेता भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात सकारात्मक पद्धतीने खेळ केला. तिसऱ्या दिवसअखेर भारताची ३ बाद २३१ अशी धावसंख्या होती. भारतीय संघ १२५ धावांनी पिछाडीवर असला, तरी अजूनही सात फलंदाज शिल्लक असल्याने हा सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे.

हेही वाचा >>>WI vs NZ : धक्कादायक! झेल घेण्यासाठी गेलेल्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर आदळला वेगवान चेंडू, VIDEO होतोय व्हायरल

दुसऱ्या डावात भारताच्या आघाडीच्या फळीतील सर्वच फलंदाजांनी कामगिरी उंचावली. यशस्वी जैस्वाल (५२ चेंडूंत ३५) आणि रोहित या मुंबईकरांनी ७२ धावांची सलामी दिली. डावखुरा फिरकीपटू एजाज पटेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात जैस्वाल बाद झाला. यष्टिरक्षक टॉल ब्लंडेलने त्याला यष्टिचित केले. रोहितने अर्धशतक पूर्ण केले. मात्र, ६३ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावांची खेळी केल्यावर रोहितला एजाजने त्रिफळाचित केले.

यानंतर कोहली आणि सर्फराज यांनी अप्रतिम फलंदाजी केली. सर्फराजने आक्रमक शैलीत खेळताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दडपण आणले. त्याने एजाजच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार मारले. दुसऱ्या बाजूने कोहलीनेही धावांची गती वाढवली. हे दोघे खेळपट्टीवर टिकून राहणार असे वाटत असतानाच दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर कोहली बाद झाला. ऑफ-स्पिनर ग्लेन फिलिप्सने त्याला यष्टिरक्षक ब्लंडेल याच्याकरवी झेलबाद केले. कोहलीने आठ चौकार आणि एका षटकारासह १०२ चेंडूंत ७० धावांची खेळी केली. तसेच त्याने आणि सर्फराजने १६३ चेंडूंत १३६ धावांची भागीदारी रचली. दिवसअखेर सर्फराज ७८ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांसह ७० धावा करून नाबाद होता.

हेही वाचा >>>WI vs NZ : न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत पटकावलं फायनलचं तिकीट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार जेतेपदाची लढत

त्याआधी, तिसऱ्या दिवशी ३ बाद १८० धावांवरून पुढे खेळताना न्यूझीलंडने पहिल्या सत्रातच चार फलंदाज गमावले. न्यूझीलंडची एकवेळ ७ बाद २३३ अशी स्थिती होती. एका बाजूने गडी बाद होत असताना दुसऱ्या बाजूने रचिन रवींद्र उत्तम फलंदाजी करत होता. अखेर त्याला टीम साऊदीची (७३ चेंडूंत ६५) साथ लाभली. या दोघांनी आठव्या गड्यासाठी १३२ चेंडूंतच १३७ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांचे खच्चीकरण केले. रचिनने कसोटी कारकीर्दीतील दुसरे शतक साकारले. अखेर सिराजने साऊदीला बाद करत ही जोडी फोडली. मग कुलदीप यादवने एजाज (४) आणि रचिन यांना माघारी धाडत न्यूझीलंडचा डाव संपुष्टात आणला.

कोहलीच्या ९००० धावा

बंगळूरु कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक साकारताना विराट कोहलीने कसोटी कारकीर्दीत ९००० धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. ११६वा कसोटी सामना खेळणाऱ्या कोहलीच्या नावे आता ९०१७ धावा झाल्या आहेत. केवळ सचिन तेंडुलकर (१५,९२१), राहुल द्रविड (१३,२६५) आणि सुनील गावस्कर (१०,१२२) यांनी कोहलीहून अधिक धावा केल्या आहेत.

१३७

रचिन रवींद्र आणि टीम साऊदी यांनी १३७ धावांची भागीदारी रचली. भारताविरुद्धच्या कसोटीत न्यूझीलंडकडून आठव्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारीच्या डियॉन नॅश आणि डॅनियल व्हिट्टोरी यांच्या विक्रमाशी त्यांनी बरोबरी साधली.

संक्षिप्त धावफलक

● भारत (पहिला डाव) : ४६

● न्यूझीलंड (पहिला डाव) : ९१.३ षटकांत सर्वबाद ४०२ (रचिन रवींद्र १३४, डेव्हॉन कॉन्वे ९१, टीम साऊदी ६५; रवींद्र जडेजा ३/७२, कुलदीप यादव ३/९९)

● भारत (दुसरा डाव) : ४९ षटकांत ३ बाद २३१ (सर्फराज खान नाबाद ७०, विराट कोहली ७०, रोहित शर्मा ५२; एजाज पटेल २/७०, ग्लेन फिलिप्स १/३६)