*आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला सामना * युवराज आणि हरभजनच्या पुनरागमनावर साऱ्यांचेच लक्ष
कर्करोगाची लढाई जिंकलेला लढवय्या युवराज सिंग शनिवारी विश्वचषकानंतर पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात उतरेल ते हे मैदान मारण्यासाठीच. युवराजबरोबर हरभजन सिंग या दोघांच्याही पुनरागमनावर साऱ्यांचेच लक्ष असेल. कसोटी मालिकेनंतर आता ट्वेन्टी-२० क्रिकेटचे युद्ध सुरू होत असून त्यासाठी भारत आणि न्यूझीलंड हे दोन्हीही संघ सज्ज आहे. कसोटी मालिका जिंकल्यामुळे भारताचे मनोबल उंचावलेले असेल. पण कसोटी आणि ट्वेन्टी-२० या दोन्ही क्रिकेटच्या प्रकारांमध्ये मोठा बदल असल्याने दोन्ही संघांचे पारडे समान समजले जात आहे.
युवराज विश्वविजयाचा शिल्पकार ठरला होता, मालिकावीराच्या पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले होते, पण त्यानंतर कर्करोगामुळे तो एकही सामना खेळू शकला नाही. त्यानंतर अमेरिकेत जाऊन त्याने उपचार घेतले आणि आता क्रिकेटचे मैदान गाजवायला तो सज्ज झाला आहे. दुसरीकडे दुखापतीचे कारण देत हरभजनने इंग्लंड दौऱ्यातून पळ काढला होता. त्यानंतर त्याला स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नसल्याने संघात पुनरागमन करणे शक्य झाले नाही. ट्वेन्टी-२० विश्वचषक लक्षात घेऊन त्याची या संघात आश्चर्यकारकरीत्या निवड करण्यात आली आहे. कारण हरभजननंतर आर. अश्विनने चांगली कामगिरी केली आहे, त्याने हरभजनची उणीव कधीही जाणवू दिली नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यात या दोघांपैकी कोणाला संधी द्यायची, हे मोठे कोडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षकांपुढे असेल. त्याचबरोबर लक्ष्मीपती बालाजीला पुनरागमन करण्याची संधी मिळते का, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरेल. भारतीय फलंदाजांमध्ये गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांना लय सापडते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी चांगल्या फॉर्मात आहेत. अष्टपैलू इरफान पठाणकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा नक्कीच असेल.
न्यूझीलंडच्या संघात अष्टपैलू जेकब ओरम आणि अनुभवी फिरकीपटू डॅनियल व्हेटोरीचे पुनरागमन झाले असून त्याच्या कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष असेल. फलंदाजीची जबाबदारी कर्णधार रॉस टेलर, मार्टिन गप्तील आणि नॅथन व ब्रेन्डन या मॅक्क्युलम बंधूंवर असेल. तर गोलंदाजीची जबाबदारी व्हेटोरी आणि ओरम यांच्यासह कायले मिल्स, टीम साऊथी यांच्यावर असेल.
कर्णधार उवाच
युवराज सिंग आणि हरभजन सिंग हे संघातील आपली जागा कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असतील, संघाच्या दृष्टीने ही एक चांगली बाब आहे. आमच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. शनिवारच्या सामन्यात सर्वोत्तम संघ निवडण्यावर आमचा भर असेल. काही प्रयोग करून सर्वोत्तम कामगिरी करण्याचाच आमचा प्रयत्न असेल. प्रतिस्पध्र्यासाठी आम्ही वेगळी रणनीती आखलेली असली तरी सामन्याचे अधिक दडपण आम्ही घेणार नाही.
– महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार
युवा खेळाडूंमध्ये जोश आहे, तर डॅनियल व्हेटोरी आणि जेकब ओरमसारख्या खेळाडूंकडे अनुभव. त्यामुळे संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला समन्वय आहे. ओरम, व्हेटोरी आणि मिल्स यांना भारतात खेळण्याचा चांगला अनुभव आहे, त्याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध आमची कामगिरी चांगली राहिलेली आहे. भारतीय संघ आपल्या मैदानात दादाच आहे, पण त्यांच्यावर मात करण्याची क्षमता नक्कीच आमच्यात आहे.
– रॉस टेलर, न्यूझीलंडचा कर्णधार
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, रोहित शर्मा, युवराज सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, हरभजन सिंग, आर. अश्विन, झहीर खान, लक्ष्मीपती बालाजी, अशोक दिंडा, पीयूष चावला आणि मनोज तिवारी.
न्यूझीलंड : रॉस टेलर (कर्णधार), ब्रेन्डन मॅक्क्युलम, नॅथन मॅक्क्युलम, मार्टिन गप्तील, केव विल्यमसन, डॅनियल व्हेटोरी, टीम साऊथी, अॅडम मिल्ने, रोनी हिरा, कायले मिल्स आणि बी.जे. वॉल्टिंग.
सामन्याची वेळ : संध्याकाळी ७ पासून.