*आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला सामना * युवराज आणि हरभजनच्या पुनरागमनावर साऱ्यांचेच लक्ष
कर्करोगाची लढाई जिंकलेला लढवय्या युवराज सिंग शनिवारी विश्वचषकानंतर पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात उतरेल ते हे मैदान मारण्यासाठीच. युवराजबरोबर हरभजन सिंग या दोघांच्याही पुनरागमनावर साऱ्यांचेच लक्ष असेल. कसोटी मालिकेनंतर आता ट्वेन्टी-२० क्रिकेटचे युद्ध सुरू होत असून त्यासाठी भारत आणि न्यूझीलंड हे दोन्हीही संघ सज्ज आहे. कसोटी मालिका जिंकल्यामुळे भारताचे मनोबल उंचावलेले असेल. पण कसोटी आणि ट्वेन्टी-२० या दोन्ही क्रिकेटच्या प्रकारांमध्ये मोठा बदल असल्याने दोन्ही संघांचे पारडे समान समजले जात आहे.
युवराज विश्वविजयाचा शिल्पकार ठरला होता, मालिकावीराच्या पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले होते, पण त्यानंतर कर्करोगामुळे तो एकही सामना खेळू शकला नाही. त्यानंतर अमेरिकेत जाऊन त्याने उपचार घेतले आणि आता क्रिकेटचे मैदान गाजवायला तो सज्ज झाला आहे. दुसरीकडे दुखापतीचे कारण देत हरभजनने इंग्लंड दौऱ्यातून पळ काढला होता. त्यानंतर त्याला स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नसल्याने संघात पुनरागमन करणे शक्य झाले नाही. ट्वेन्टी-२० विश्वचषक लक्षात घेऊन त्याची या संघात आश्चर्यकारकरीत्या निवड करण्यात आली आहे. कारण हरभजननंतर आर. अश्विनने चांगली कामगिरी केली आहे, त्याने हरभजनची उणीव कधीही जाणवू दिली नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यात या दोघांपैकी कोणाला संधी द्यायची, हे मोठे कोडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षकांपुढे असेल. त्याचबरोबर लक्ष्मीपती बालाजीला पुनरागमन करण्याची संधी मिळते का, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरेल. भारतीय फलंदाजांमध्ये गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांना लय सापडते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी चांगल्या फॉर्मात आहेत. अष्टपैलू इरफान पठाणकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा नक्कीच असेल.
न्यूझीलंडच्या संघात अष्टपैलू जेकब ओरम आणि अनुभवी फिरकीपटू डॅनियल व्हेटोरीचे पुनरागमन झाले असून त्याच्या कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष असेल. फलंदाजीची जबाबदारी कर्णधार रॉस टेलर, मार्टिन गप्तील आणि नॅथन व ब्रेन्डन या मॅक्क्युलम बंधूंवर असेल. तर गोलंदाजीची जबाबदारी व्हेटोरी आणि ओरम यांच्यासह कायले मिल्स, टीम साऊथी यांच्यावर असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा