गेल्या काही दिवसांपासून आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या काही संघांना डच्चू मिळणार, अशी चर्चा होती. पण इंच्योन, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी केंद्रीय मंत्रालयाने ६७९ जणांच्या चमूला परवानगी देत या चर्चेला पूर्णविराम दिला. केंद्रीय क्रीडामंत्री सरबनंदा सोनोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला.
भारताच्या या चमूत ५१६ खेळाडू, १६३ प्रशिक्षक आणि सहयोगी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून ६६२ खेळाडू आणि २८० पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या ९४२ जणांच्या चमूची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडे केली होती. वैयक्तिक क्रीडा प्रकारांना प्राधान्य देण्यात येणार असून पदकांची अपेक्षा नसलेल्या सांघिक खेळांना डच्चू देण्यात येईल, असे त्यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) स्पष्ट  केले होते. त्यामुळे फुटबॉल, टेबल टेनिस, हॅण्डबॉल, बास्केटबॉल आणि सिपॅकतेकरॉ या क्रीडा प्रकारांवर टांगती तलवार होती. पण या प्रकारातून भारताने माघार घेतल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा आशियाई ऑलिम्पिक परिषदेने दिला होता. त्यामुळे सर्व क्रीडा प्रकारांचा आशियाई स्पर्धेसाठीच्या भारतीय चमूत समावेश करण्यात आला.
आता भारतीय खेळाडू २८ क्रीडा प्रकारांत प्रतिनिधित्व करणार आहेत. २०१०च्या गुआंगझाऊ येथील आशियाई स्पर्धेसाठी भारताने ६०९ जणांचा चमू पाठवला होता. खेळाडू तसेच पदाधिकाऱ्यांच्या खर्चाची तसेच अन्य बाबींची तरतूद करता यावी, यासाठी कोणत्याही प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची यादी क्रीडा मंत्रालयाकडे ९० दिवसांच्या आत पाठवावी लागते. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने ही यादी २१ ऑगस्ट रोजी क्रीडा मंत्रालयाकडे पाठवली होती. त्यामुळेच काही खेळांना डच्चू देणार, अशी चर्चा रंगली होती.

भारताचा फुटबॉल संघ जाहीर
नवी दिल्ली : आशियाई स्पर्धेतील भारतीय फुटबॉल संघाच्या समावेशाला क्रीडा मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवण्यात आल्यानंतर भारताच्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा करण्यात आली. पुरुषांचा पहिला सामना १५ सप्टेंबरला संयुक्त अरब अमिरातीशी, तर महिलांचा सलामीचा सामना १४ सप्टेंबरला मालदीवशी होणार आहे. पुरुष संघ : गोलरक्षक : अमरिंदर सिंग, रवी कुमार, कमलजीत सिंग. बचावफळी : प्रितम तोटल, कीनन अल्मेडा, जॉयनर लॉरेंसो, शंकर सांपिंगीराज, संदेश झिंगन, नारायण दास. मधली फळी : प्रणय हल्देर, क्लिफ्टन डायस, सियाम हंगल, लालरिंदिका राल्टे, मिलन सिंग. आघाडीची फळी : फ्रान्सिस फर्नाडेस, एस. डोंगेल, सुनील छेत्री, रॉबिन सिंग, हाओकिप थोंगसोशिम, मंदार देसाई. महिला संघ : गोलरक्षक : ओक्राम रोशनी देवी, आदिती चौहान, पुष्पा तिर्की. बचावफळी : अशेम रोमी देवी, आशालता देवी, तुली गून, राधाराणी देवी, सुप्रवा समाल, उपामती देवी. मधली फळी : प्रेमी देवी, अमूल्या कमाल, मंदाकिणी देवी, ओनाम बेमबेम देवी, कमला देवी. आघाडीची फळी : सस्मिता मलिक, प्रमेश्वरी देवी, डंगमेई ग्रेस, बाला देवी.

Story img Loader