गेल्या काही दिवसांपासून आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या काही संघांना डच्चू मिळणार, अशी चर्चा होती. पण इंच्योन, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी केंद्रीय मंत्रालयाने ६७९ जणांच्या चमूला परवानगी देत या चर्चेला पूर्णविराम दिला. केंद्रीय क्रीडामंत्री सरबनंदा सोनोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला.
भारताच्या या चमूत ५१६ खेळाडू, १६३ प्रशिक्षक आणि सहयोगी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून ६६२ खेळाडू आणि २८० पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या ९४२ जणांच्या चमूची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडे केली होती. वैयक्तिक क्रीडा प्रकारांना प्राधान्य देण्यात येणार असून पदकांची अपेक्षा नसलेल्या सांघिक खेळांना डच्चू देण्यात येईल, असे त्यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) स्पष्ट केले होते. त्यामुळे फुटबॉल, टेबल टेनिस, हॅण्डबॉल, बास्केटबॉल आणि सिपॅकतेकरॉ या क्रीडा प्रकारांवर टांगती तलवार होती. पण या प्रकारातून भारताने माघार घेतल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा आशियाई ऑलिम्पिक परिषदेने दिला होता. त्यामुळे सर्व क्रीडा प्रकारांचा आशियाई स्पर्धेसाठीच्या भारतीय चमूत समावेश करण्यात आला.
आता भारतीय खेळाडू २८ क्रीडा प्रकारांत प्रतिनिधित्व करणार आहेत. २०१०च्या गुआंगझाऊ येथील आशियाई स्पर्धेसाठी भारताने ६०९ जणांचा चमू पाठवला होता. खेळाडू तसेच पदाधिकाऱ्यांच्या खर्चाची तसेच अन्य बाबींची तरतूद करता यावी, यासाठी कोणत्याही प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची यादी क्रीडा मंत्रालयाकडे ९० दिवसांच्या आत पाठवावी लागते. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने ही यादी २१ ऑगस्ट रोजी क्रीडा मंत्रालयाकडे पाठवली होती. त्यामुळेच काही खेळांना डच्चू देणार, अशी चर्चा रंगली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा