सात्त्विक-चिराग, सेन यांना ऐतिहासिक जेतेपद
भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेन आणि आघाडीची जोडी सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी ऐतिहासिक कामगिरी करताना रविवारी इंडिया खुल्या बॅर्डंमटन स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरी गटाचे जेतेपद पटकावले.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात २० वर्षीय लक्ष्यने विश्वविजेत्या लोह किन येवला धूळ चारताना कारकीर्दीतील पहिले सुपर ५०० दर्जाच्या स्पर्धेचे जेतेपद ठरले.
तसेच पुरुष दुहेरीच्या अंतिम लढतीत सात्त्विक-चिरागने तीन वेळा जगज्जेत्या मोहम्मद अहसान आणि हेंद्रा सेतिवान या इंडोनेशियन जोडीवर सरशी साधताना इंडिया खुल्या बॅर्डंमटन स्पर्धेतील दुहेरीचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय जोडी ठरण्याचा मान मिळवला.
मागील महिन्यात जागतिक अजिंक्यपद बॅर्डंमटन स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या लक्ष्यने रविवारी पाचव्या मानांकित येवचा २४-२२, २१-१७ असा पराभव केला. ५४ मिनिटे चाललेल्या या सामन्याच्या पहिल्या गेममध्ये लक्ष्यकडे १६-९ अशी आघाडी होती. मात्र, जगज्जेत्या येवने पुनरागमन करताना लक्ष्यला सहजासहजी गुण मिळवण्याची संधी दिली नाही. त्याने २०-१९ अशी आघाडीही मिळवली. परंतु २२-२२ अशी बरोबरी असताना लक्ष्यने पुढील दोन्ही गुण मिळवत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये येवने लढा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, लक्ष्यने २१-१७ अशी बाजी मारताना पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली.
पुरुष दुहेरीच्या अंतिम लढतीत सात्त्विक-चिरागने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या अहसान-सेतिवान या जोडीला २१-१६, २६-२४ असे पराभूत केले. याआधी या दोन जोड्यांमध्ये झालेल्या चारपैकी केवळ एका सामन्यात सात्त्विक-चिरागला विजय मिळवता आला होता. मात्र, रविवारी त्यांनी उत्कृष्ट खेळ केला. सात्त्विक-चिराग जोडीने पहिला गेम पाच गुणांच्या फरकाने जिंकल्यावर दुसऱ्या गेममध्ये अहसान-सेतिवानने झुंजार खेळ केला. मात्र, २४-२४ अशी बरोबरी असताना पुढील दोन्ही गुण मिळवत भारतीय जोडीने हा सामना जिंकला.
कौतुकाचा वर्षाव
इंडिया खुल्या बॅर्डंमटन स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर लक्ष्य, तसेच सात्त्विक-चिराग जोडीवर समाजमाध्यमावरून कौतुकाचा वर्षाव झाला. ‘‘लक्ष्य, तू करून दाखवलेस. पदार्पणातच विश्वविजेत्या खेळाडूविरुद्ध जिंकणे हे खूप मोठे यश आहे,’’ असे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘ट्वीट’ केले. ‘‘इंडिया खुली स्पर्धा जिंकल्याबद्दल लक्ष्यचे अभिनंदन. दुहेरीचे जेतेपद पटकावणाऱ्या सात्त्विक-चिरागची कामगिरीही कौतुकस्पद होती. भारतासाठी हा खूप छान दिवस आहे,’’ असे भारताचा बॅर्डंमटनपटू पारुपल्ली कश्यप म्हणाला. तसेच कश्यपची पत्नी आणि भारताची आघाडीची खेळाडू सायना नेहवालनेही दोघांचे अभिनंदन केले.